धान पट्ट्यातील भंडारा जिल्ह्याचा रबी पीक विम्यात यंदा पहिल्यांदाच समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 05:00 AM2020-12-13T05:00:00+5:302020-12-13T05:00:23+5:30
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. परंतु रबी हंगामात गहू, हरभरा आणि लाखोळीची लागवड केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु यंदा त्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु आतापर्यंत खरीप हंगामातील विमा कंपन्यांचा अनुभव बघता शेतकरी फारसे उत्सूक दिसत नाही.
संताेष जाधवर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धानाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्याचा यंदा पहिल्यांदाच रबी पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात विमा काढला जातो. यंदाच्या खरीपात एक लाख ८३ हजार ४०१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र मोठे नुकसान होवूनही अत्यल्प शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ झाला. खरीपाचा अनुभव गाठीशी असल्याने रबी पीक विमा काढण्यास शेतकरी अनुस्तुक दिसत आहे. पीक विमा भरण्याची अंतिम तिथी तीन दिवसावर असताना केवळ ६३ शेतकऱ्यांनी रबी पीक विमा काढला आहे.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. परंतु रबी हंगामात गहू, हरभरा आणि लाखोळीची लागवड केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु यंदा त्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु आतापर्यंत खरीप हंगामातील विमा कंपन्यांचा अनुभव बघता शेतकरी फारसे उत्सूक दिसत नाही. पदरमोड करून विमा हप्ता भरता तेवढेही पैसे परत मिळत नसतील तर विमा काढायचा तरी कशाला, असा सवाल केला जातो. पीक विम्याकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.
खरीप नुकसानीचे अनुदान
भंडारा जिलह्यात अतिवृष्टी आणि महापुराने धान पिकासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ८५ हजार ६५४ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. मात्र खरीप हंगामात अतिवृष्टीत आणि महापूरात २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ४०१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.
विमा काढणार नाही
खरीप हंगामात मी धान पिकाचा विमा उतरविला होता. अतिवृष्टी आणि त्यानंतर तुडतुडा पिकाने प्रचंड नुकसान झाले. मात्र विमा कंपनीकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. दरवर्षी खरीप पीक विमा भरतो. मात्र मदत मिळत नसल्याने रबी पिकांचा पीक विमा उतरविणार नाही. तसेही रबीत नुकसान कमी होते.
- सुरेश गिरेपुंजे, खरबी नाका.