इतिहासात पहिल्यांदा महाशिवरात्रीलाच गायमुख देवस्थान कुलूप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:03 AM2021-03-13T05:03:42+5:302021-03-13T05:03:42+5:30
राहुल भुतांगे तुमसर : संपूर्ण विदर्भात व लगतच्या मध्यप्रदेशात छोटा महादेव म्हणून सुप्रसिद्ध असलेली तालुक्यातील गायमुख यात्रा यंदा कोरोनाच्या ...
राहुल भुतांगे
तुमसर : संपूर्ण विदर्भात व लगतच्या मध्यप्रदेशात छोटा महादेव म्हणून सुप्रसिद्ध असलेली तालुक्यातील गायमुख यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री दिनीच देवस्थान कुलूप बंद ठेवल्याची इतिहासात पहिल्यांदाच ठेवावे लागल्याने कोरोनाने शेकडो वर्षाच्या परंपरेला गालबोट लागले आहे. गायमुख यात्रेत होणारी कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांना पाच किमी अंतरावरून नवस फेडावे लागत असून शिव भक्तांनी नाराजी व्यक्त केली. सध्या गायमुख येथील शिव मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिसरात सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.
तालुक्यातील तीर्थक्षेत्र गायमुख येथे महाशिवरात्री निमित्त पाच दिवस भरणाऱ्या यात्रेत विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून लाखोंच्या संख्येने भावीक नवस फेडण्यासाठी यात्रेत येत असतात. या यात्रेत शेतकऱ्यांना उपयोगी शेती अवजारे, घरोपयोगी साहित्य, पूजेचे साहित्य, खेळणी, हॉटेल्स, खाद्यपदार्थ, फळे, चहानाश्ता, रसवंती, कपडे, सौंदर्य प्रसाधने, भांडी, करमणुकीचे साहित्य अशा नानाविध प्रकारची दुकाने सायकल स्टँड स्थानिक व परिसरातील नागरिक लावायचे. येणारे भाविक उत्साहाने साहित्य खरेदी करीत होते. त्यामुळे आदिवासीबहुल गावकऱ्यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळायचे. मात्र कोरोनाने त्यांचा रोजगार व व्यवसाय बुडाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हाधिकारी यांनी गायमुख तीर्थक्षेत्र परिसरात कलम १४४ लागू केली आहे व यात्रा रद्द केली, त्याची पूर्व सूचना दिली असली तरी श्रद्धेपोटी नवस फेडण्यासाठी बऱ्यापैकी श्रद्धाळू नंदी घेऊन गायमुख तीर्थक्षेत्रस्थळी पोहोचले. मात्र तुमसरकडून येणाऱ्या भक्तांना तीर्थक्षेत्रापासून पाच किलोमीटर अंतरावरील रामपूर येथे थांबविण्यात आले. जांबवरून येणाऱ्या भक्तांना तीर्थक्षेत्रपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गायमुख गावाजवळ थांबविण्यात आले. त्यामुळे भक्तात नाराजी दिसून आली. भक्तांना दुरूनच नवस फेडण्याची परिस्थिती ओढावली, तर लाखों भाविकांना यात्रेपासून वंचित राहावे लागले आहे.