आधी लेखी परीक्षा, नंतर शारीरिक चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:18 PM2019-03-02T22:18:08+5:302019-03-02T22:18:25+5:30
पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा अशी पद्धत होती. मात्र यावर्षीपासून भरती प्रक्रियेत बदल झाला असून आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. यात उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा अशी पद्धत होती. मात्र यावर्षीपासून भरती प्रक्रियेत बदल झाला असून आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. यात उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.
शासनाच्या गृह विभागाने पोलीस भरती प्रक्रियेत बदल केला आहे. त्या संदर्भातील आदेश निर्गमीत केले आहेत. पोलीस शिपाई पदावर बुद्धीमान उमेदवारांची निवड होण्यासाठी हा बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी घेतली जात होती. अनेकदा शारीरिक चाचणीत विद्यार्थी जखमी होत होते. तसेच १५ ते २० दिवस चालणाऱ्या या शारीरिक चाचणीमुळे लेखी परीक्षेचा अभ्यासही होत नव्हता. त्यामुळे अनेक जण पोलीस भरतीपासून वंचित राहात होते. हा प्रकार टाळण्यासाठी भरतीप्रक्रियेत सर्वप्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारापैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडेल. यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांना जास्त वेळ ताटकळत राहावे लागणार नाही.
पोलीस भरतीच्या जाहिरातीची उमेदवारांमध्ये प्रचंड उत्स्काता आहे. अनेक तरूण गत काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. पूर्वी शारीरिक चाचणी आधी घेतली जात असल्याने सर्व विद्यार्थ्यांचा भर शारीरिक कसरतीकडेच अधिक असायचा. दररोज व्यायाम करून पोलीस भरतीची तयारी केली जायची. परंतु लेखी परीक्षा पास झाल्यानंतरच शारीरिक चाचणी होणार असल्याने अनेक उमेदवारांचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भरतीसाठी तरुणांची जय्यत तयारी
पोलीस दलात भरती होण्यासाठी अनेक तरुण दोन ते तीन वर्षापासून परिश्रम करतात. शारीरिक कसरतीसोबतच लेखी परीक्षेचाही अभ्यास करतात. प्रत्येक शहरात पोलीस भरतीसाठी विशेष मार्गदर्शन वर्गही सुरु करण्यात आले आहेत. यामुळे योग्य उमेदवार पोलीस भरतीत यशस्वी ठरत आहे.