मत्स्यपालकांनी विम्याचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2017 12:25 AM2017-03-19T00:25:15+5:302017-03-19T00:25:15+5:30
भंडारा जिल्ह्यातील शिवनीबांध येथील नंदागवळी मत्स्यपालन सहकारी संस्था सभासद ऋषी हिडकू सतीमेश्राम हे संस्थेकडील सासरा तलावात मासेमारी करीत असताना त्यांचा मृत्यू झाला.
संजय केवट : लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील शिवनीबांध येथील नंदागवळी मत्स्यपालन सहकारी संस्था सभासद ऋषी हिडकू सतीमेश्राम हे संस्थेकडील सासरा तलावात मासेमारी करीत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्या परिवाराला भारत सरकारतर्फे नियुक्त, राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघाचे माजी संचालक संजय केवट यांनी संबंधित विमा कंपनीला पाठपुरावा करून या कुटुंबाला २ लाख रूपये लाभार्थी अनुराधा ऋषी सतीमेश्राम यांना मिळवून दिले.
सदर योजनेचा लाभ हा देशातील प्रत्येक मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या सभासदाला घेता येतो. त्यासाठी प्रत्येक मत्स्यपालन सहकारी संस्थेने संपूर्ण संस्था सभासदाची यादी जिल्हा सहाय्यक आयुक्तांकडे सादर करावी. या विमा योजनेचा लाभ राज्य सरकार व केंद्र सरकार विमा कंपनीला देय करतात. ही योजना तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या काळात सुरू झाली होती. पूर्वी एक लाख रूपयांची मदत करण्यात येत होती. आता ही रक्कम वाढवून दोन लाख रूपये करण्यात आल्याचे संजय केवट यांनी आयोजित कार्यक्रमात सांगितले.
या धनादेशाचे वाटप सहाय्यक आयुक्त कार्यालयात करण्यात आले. यावेळी मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त पसारकर पाटील, संजय चाचिरे, वलथरे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सभासद उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)