मासेमारी बंद पडली, जल पर्यटनाचा रोजगार समाजाला द्या; ढीवर समाजबांधव करणार जलसमाधी आंदोलन
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: February 26, 2024 06:41 PM2024-02-26T18:41:32+5:302024-02-26T18:41:51+5:30
उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता समाजच आता धरणामुळे थडीवर पडला, मात्र लक्ष द्यायला कुणी नाही, असा आक्रोश करीत जिल्ह्यातील ढिवर बांधव २७ फेब्रुवारीला गोसेखुर्द प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करणार आहे.
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पामुळे ढीवर समाजाचे मोठे नुकसान झाले. पारंपारिक पद्धतीने चालत आलेली धरणासमोरील मासेमारी बंद पडली. डांगर-टरबुजाच्या वाड्या नष्ट झाल्या. उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता समाजच आता धरणामुळे थडीवर पडला, मात्र लक्ष द्यायला कुणी नाही, असा आक्रोश करीत जिल्ह्यातील ढिवर बांधव २७ फेब्रुवारीला गोसेखुर्द प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करणार आहे.
या प्रकल्पामुळे सर्वाधिक नुकसान ढीवर समाजाचे झाल्याची जनभावना आहे. शेतकरी, धरणग्रस्तांना मोबदला देण्यात आला. पण ज्या समाजाचा उदरनिर्वाह वैनगंगा नदीवर अवलंबून होता, त्या समाजाच्या प्रपंचाकडेच दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. याचाच विरोध करत गोसे प्रकल्पावर तयार होत असलेल्या जल पर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगारात १०० टक्के आरक्षण भंडारा जिल्ह्याला देण्यात यावे व ५० टक्के प्राधान्य पवनी तालुक्यातील ढीवर समाजाला देण्याची मागणी विदर्भ युवा क्रांती ढीवर समाज संघटनेकडून करण्यात येत आहे.
समाजाच्या या मागणीसाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडे विनवण्या करूनही लक्ष दिले जात नसल्याने विदर्भ युवा ढीवर समाज संघटनेचे अध्यक्ष हर्षल वाघमारे यांच्यासह अनेक ढीवर समाज बांधवांनी गोसे धरणावरून पाण्यात उडी मारून जलसमाधी घेणार असल्याची साद दिली आहे. यामुळे मंगळवारी धरणावर हजारो ढीवर समाजबांधव जमा होण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
ढीवर समाजाकडे दुर्लक्ष केलेल्या प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही जलसमाधी घेत आहोत. जीवंतपणी समाजाला वाऱ्यावर सोडले. किमान आमच्या मृत्यूनंतर तरी शासन या दुर्लक्षित समाजाकडे लक्ष देईल.
- हर्षल वाघमारे, अध्यक्ष, विदर्भ युवा ढीवर समाज संघटना