मत्स्यबीज संवर्धन केंद्र कुलूपबंद
By admin | Published: April 1, 2017 12:42 AM2017-04-01T00:42:11+5:302017-04-01T00:42:11+5:30
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा असून येथील गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते.
मासेमारांना जावे लागते परप्रांतात : पाणी व कर्मचाऱ्यांची वानवा, सदनिकाची दुर्दशा
मोहन भोयर तुमसर
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा असून येथील गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते. मासेमारांना स्थानिक पातळीवर मत्स्यबीज उपलब्ध व्हावे म्हणून नागठाणा येथे मत्स्यबीज संवर्धन केंद्र सुरू करण्यात आले होते. सुमारे सात ते आठ वर्षापासून राज्य शासनाचे कोट्यवधींचे मत्स्यबीज केंद्र धुळखात पडून आहे. येथील साहित्याची नासधूस झाली असून काही साहित्य चोरीला गेले आहे. मनुष्यबळ तथा नियोजनाचा येथे अभाव आहे.
तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमेवर नागठाणा हे गाव आहे. गावाबाहेर राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून मत्स्यबीज केंद्र सुरू केले होते. सुरवातीला हे मत्स्यबीज केंद्र सुरळीत सुरू होते. मागील सात ते आठ वर्षापासून हे मत्स्यबीज केंद्र कायम कुलूपबंद आहे. येथील अनेक साहित्यांची चोरी झाली. फाटक चोरीला गेले आहे. मत्स्यबिजाचे सिमेंट टाक्यांची तोडफोड झाली आहे. येथे कर्मचाऱ्यांच्या चार सदनिका बांधल्या आहेत. त्यासुद्धा बेवारस पडून आहेत. १० ते १२ एकरात हे मत्स्यबिज संवर्धन केंद्र आहे.
भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोळी बांधव करतात त्यांना स्वस्त व दर्जेदार मत्स्यबीज सहज उपलब्ध व्हावे याकरिता नागठाणा येथे राज्य शासनाने मत्स्यबीज केंद्र सुरू केले होते. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांची येथे नियुक्ती करण्यात आली होती हे विशेष. भंडारा जिल्ह्यात दुसरे मत्स्यबीज संवर्धन केंद्र साकोली येथील शिवनीबांध जलाशयाजवळ आहे, परंतु भंडारा जिल्ह्याकरिता हे संवर्धन केंद्र मत्स्यबीज उपलब्ध करू शकत नाही. त्यामुळे मासेमार छत्तीसगढ तथा पश्चिम बंगाल येथून मत्स्यबीज खरेदी करण्याकरिता जातात. सर्वसामान्य मासेमारांना हे परवडणारे नाही. त्यामुळे मासेमारांना व्यवसाय करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहे.
नागठाणा येथे पेंच प्रकल्पातून पाणी उपलब्ध होते, परंतु मागील काही वर्षापासून पाणी उपलब्ध होत नाही, अशी माहिती आहे. येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. कोट्यवधींची इमारत व मत्स्यबीजाकरिता मोठे टाके तयार करण्यात आले. त्यांचीही नासधूस करण्यात आली आहे.
राज्य शासनाने हे मत्स्यबीज संवर्धन केंद्र कुलूपबंद केले आहे. येथे मोठी ११ मत्स्यकुंभ तयार केले आहेत. मत्स्यबीज संवर्धन केंद्राकरिता अतिशय पोषक वातावरण आहे, परंतु शासनाने मत्स्यबीज संवर्धन केंद्र का बंद केले हा संशोधनाचा विषय आहे. शासनाने सदनिका व मत्स्यकुंभ देखरेखीखाली एक साधा चौकीदार येथे नियुक्त केला नाही. मत्स्यबीज संवर्धन केंद्र सुरू करण्यापूर्वी नियमानुसार जागा हस्तांतरण करून कोट्यवधींचा खर्च केला.
नागठाणा येथील मत्स्यबीज संवर्धन केंद्राकरिता मुबलक पाण्याची आवश्यकता असून कर्मचाऱ्यांची कमतरता या कारणामुळे हे मत्स्यबीज संवर्धन केंद्र बंद आहे. येणाऱ्या काळात निश्चितच हे मत्स्यबीज संवर्धन केंद्र सुरू करण्यात येईल. शासन वरिष्ठ स्तरावर येथे निर्णय घेणार आहे.
-विश्वंभर पसारकर, प्रभारी सहायक आयुक्त मत्स्यविभाग भंडारा.
मागील सात आठ नाही तर १२ ते १५ वर्षापासून नागठाणा येथील मत्स्यबीज संवर्धन केंद्र बंद आहे. येथे पाण्याची सुविधा नाही. सदनिका शेवटच्या घटका मोजत आहेत. मासेमार बांधवांना परप्रांतातून मत्स्यबीज खरेदी करायला जावे लागते. हे दुर्देव आहे.
-संजय केवट, माजी राष्ट्रीय मत्स्यबीज सहकारी संघ नवी दिल्ली.