बिबट्याने केल्या पाच कोंबड्या फस्त, वासरू जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:23 AM2021-07-09T04:23:18+5:302021-07-09T04:23:18+5:30
लाखनी ते अड्याळ मार्गावर पिंपळगाव जंगलव्याप्त गाव म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी बहुसंख्येत आदिवासी समाजबांधव असतात. या गावालगत केसलवाडा जंगल ...
लाखनी ते अड्याळ मार्गावर पिंपळगाव जंगलव्याप्त गाव म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी बहुसंख्येत आदिवासी समाजबांधव असतात. या गावालगत केसलवाडा जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांचा वावर आहे. गत दोन आठवड्यापासून वाटसरुंना बिबट्याचे दर्शन हाेत आहे. गत रविवारी पिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लगत बिबट्याचे दर्शन झाले. सदर बिबट रात्रीला गावात येत असल्याच्या चर्चेने पिंपळगाव नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गावातील पथदिवे रात्रीला बंद असतात. राज्य शासनाने पथदिवे देयके जिल्हा परिषदेकडे भरण्याचे आदेश असले तरी आता मात्र प्रशासनाने पंधराव्या वित्त आयाेगातील देयके अदा करण्याचे आदेश दिले आहे. सध्यातरी जिल्ह्यातील अनेक गावातील पथदिवे बंद आहेत. त्याचाच फटका पिंपळगाव नागरिकांना बसत आहे. पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेत बिबट गावात संचार करीत आहे. या बिबट्याच्या भीतीपाेटी नागरिकांची भंबेरी उडत आहे. या मार्गावरुन दरराेज शेकडाे नागरिक ये-जा करतात. गुरुवारी पहाटेच्या सुमारास येथील मारोती चौधरी यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. याची चुणूक गावात होताच गावकऱ्यांनी बिबट्याला हुसकावून लावले. आता मानव-वन्य प्राणी संघर्ष हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.
पिंजऱ्यांची व सोलर दिव्यांची व्यवस्था करा
पिंपळगावालगत जंगल व शेतशिवार आहे. त्यामुळे नागरिकांची नेहमी रेलचेल असते. या मार्गानेच अड्याळ, लाखनी, रावणवाडी तसेच भंडाराकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वीज वितरण कंपनीने किंवा वनविभागाने सोलर दिव्यांची व्यवस्था करावी. बिबट्याचा धुमाकूळ लक्षात घेता गावालगत पिंजऱ्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. या गावानजीक माडगी येथे वनविभागाचे कार्यालय असून तातडीने गावात पाेहाेचू शकतात.