दोन अपघातात पाच जखमी
By admin | Published: June 24, 2016 01:16 AM2016-06-24T01:16:52+5:302016-06-24T01:16:52+5:30
जवाहर गेटसमोर पवनी-भंडारा मार्गावर रेती भरून आलेल्या ट्रकने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले.
ट्रकची कंटेनरला धडक : रेती भरलेल्या ट्रकची दुचाकीस धडक
पवनी : जवाहर गेटसमोर पवनी-भंडारा मार्गावर रेती भरून आलेल्या ट्रकने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. भारतीय स्टेट बँकेच्या महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी असल्याने उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेतीघाटावरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक क्र. एमएच ४० वाय २७५६ ने जवाहर गेट समोरील बसस्थानकाजवळ सकाळी १०.१५ चे सुमारास स्कुटी क्रमांक एमएच ३६ पी ९७८६ ला मागचे बाजूस धडक दिल्याने स्कुटी चालक सईद अली खान व मागे बसलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या महिला कर्मचारी लीना निमजे, जवाहरनगर उसळून खाली पडल्या. बाजूने जाणारी एक वृद्ध महिला रस्त्यावर पडल्याने जखमी झाली. लीना निमजे यांचे गुडघ्याला, डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वृद्ध महिलेस खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. किरकोळ जखमी सईद अली खान यास ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.
रेतीघाटावरून ओवरलोड व भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यांचे वेगावर व अवैध वाहतुकीवर आळा घालण्यास महसूल व पोलीस प्रशासनास अपयश येत असल्याने रेतीमाफियांची मुजोरी वाढत चालली आहे. जिल्हा प्रशासनाने रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जनतेने केली आहे.
जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभा असलेल्या कंटेनरला मागेहून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात ट्रकमधील दोन इसम जखमी झाले. दोघांनाही उपचारार्थ सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारला रात्री ११.३० वाजता सुमारास राष्ट्रीय महामार्ग ठाणा उड्डाणपुलावर घडली.
विक्की लिल्हारे (२७) व अनिल बेहरे (२८) दोन्ही रा. वाटोना नागपूर असे जखमीचे नाव आहे.
राजनांदगावहून नागपूरकडे रिकाम्या पिपाची वाहतुक करणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच. ३१ ए.पी. २८८३ ने डिझलची प्रतिक्षा करीत असलेल्या ट्रेलर कंटेनर क्रमांक एमएच ४० वाय १५६९ ला मागेहून जोरदार धडक दिली. घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला. त्याच्याविरूद्ध जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)