पाच किलो गांजा जप्त
By admin | Published: March 11, 2017 12:21 AM2017-03-11T00:21:40+5:302017-03-11T00:21:40+5:30
गोपनीय माहितीच्या आधारावर वाहनाची तपासणी करुन पाच किलो गांजा जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : तिघांना अटक, वाहनातून तस्करी
भंडारा : गोपनीय माहितीच्या आधारावर वाहनाची तपासणी करुन पाच किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर केली.
शाकीर शकुर शेख (४७) रा. बाबा मस्तानशाह वॉर्ड भंडारा, अनमोल सुखदेव वाहाणे (३२) हनुमान वॉर्ड वरठी व विजय टिकाराम कटारे (४५) रा. कस्तुरबा गांधी वॉर्ड भंडारा असे अटक केलेल्या इसमांची नावे आहेत.
माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर रात्रीच्या दरम्यान पेट्रोलींग करित असताना गोपनीय सुत्रांकडून माहिती मिळाली की नागपूरहून दोन ते तीन इसम चारचाकी वाहनातून गांजाची तस्करी करीत आहेत. याबाबतची माहिती तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक, आरसीसी पथक यांना देण्यात आली. यात शुक्रवारी पहाटे २.३० वाजतापासून भंडारा शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची चौकशी करण्यात आली.
तपासणीदरम्यान एक चारचाकी वाहन वेगाने जात असल्याचा कारणाहून पोलीसाच्या शिताफीने वाहन पकडण्यात आले. सदर वाहन क्रमांक एम एच ३६ एफ २७४८ असा असून हिरव्यारंगाच्या स्कूल बॅगमध्ये अंदाजे पाच किलो गांजा मिळून आला. यावेळी सदर इसमाच्या ताब्यातून दोन मोबाईल संच, चिलम, रोख रक्कम व वाहन असा एकूण चार लक्ष ९६ हजार ६४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर वाहन व तीन्ही इसमाना अंमली पदार्थविरोधी पथकाने ताब्यात घेवून तिघांविरुध्द भंडारा पोलिसात कलम २२ (ब) एनडीटीएस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक सावने करीत आहेत. होळी सणाचा पर्वावर ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरेश धुसर, नारायण सावने, पोलीस हवालदार कुंजलकर, रामटेके, आडे, राठोड, नागदिवे, साठवणे, घरडे, मेश्राम, पवार आदीनी सहभाग घेवून कामगिरी फत्ते केली. (प्रतिनिधी)