भरधाव व्हॅन अपघातात पाच विद्यार्थी जखमी
By admin | Published: December 30, 2015 01:33 AM2015-12-30T01:33:16+5:302015-12-30T01:33:16+5:30
मधल्या सुटीत शाळेबाहेर उभ्या असलेल्या चार विद्यार्थ्यासह एका वृद्धास विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हॅनने उडविले.
वरठी येथील घटना : भंडारा रुग्णालयात उपचारार्थ दाखल
वरठी : मधल्या सुटीत शाळेबाहेर उभ्या असलेल्या चार विद्यार्थ्यासह एका वृद्धास विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हॅनने उडविले. सदर घटना आज सकाळी ११ वाजता येथील जिल्हा परिषद हायस्कुल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात घडली. यात २ विद्यार्थी व वृद्धास किरकोळ दुखापत झाली असून दोन विद्यार्थ्याना भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चालकाविरुद्ध बेजबाबदारपणे वाहन चालविण्याचा गुन्हा नोंदविला आहे.
वरठी-तुमसर राज्य महामार्गावर जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आहे. आज सकाळी ११ वाजताच्या दरम्यान मधल्या सुटीत इयत्ता ११ विज्ञान शाखेचा विद्यार्थी अभिषेक कोचे, अक्षय गजभिये, अनिकेत उके व अकरम शेख हे चार मित्र शाळेबाहेर उभे होते. दरम्यान नेहरु वार्ड वरठी येथील शेतकरी चरणदास चव्हाण हे शेतावरून परत येत होते. अचानक रेल्वे फटकाकडून येणाऱ्या भरधाव व्हॅनने विद्यार्थ्याना व वृद्ध शेतकऱ्यास उडविले.
यात अभिषेक कोचे व अक्षय गजभिये हे गंभीररीत्या जखमी झाले. अकरम शेख व अनिकेत उके यांच्या हाताला व डोक्याला किरकोळ दुखापत झाली. सर्व विद्यार्थ्यावर आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. अभिषेक व अक्षय यांना जबर दुखापत झाल्यामुळे वैद्यकीय अधिकारी पी.एन. गजभिये यांना भंडारा येथे हलविले. जखमीवर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. प्राचार्य सुहासिनी घरडे यांच्या तक्रारीवरून वाहनचालक अक्षय सुर्यवंशी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद कदम यांच्या मार्गदर्शनात सचिन गभने करीत आहेत. (वार्ताहर)