पाऊस थांबल्याने करडी परिसरातील पाच हजार हेक्टर शेती पडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:28+5:302021-07-18T04:25:28+5:30
करडी (पालोरा) : अपुऱ्या पावसामुळे करडी परिसरातील पाच हजार हेक्टर शेती रोवणीविणा पडित आहे. तर कोका अभयारण्याच्या परिसरातील २८ ...
करडी (पालोरा) : अपुऱ्या पावसामुळे करडी परिसरातील पाच हजार हेक्टर शेती रोवणीविणा पडित आहे. तर कोका अभयारण्याच्या परिसरातील २८ तलावात पाण्याचा अत्यल्प जलसाठा असल्याने समस्या आणखी बिकट झाली आहे.
सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सुरू केलेली रोवणी रखडलेली आहेत. आठवड्याच्या तपानंतर एकच दिवस पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. कोमेजलेल्या पऱ्ह्यांना जीवनदान मिळाले. परंतु त्यानंतर पुन्हा आठवडा लोटला असताना कडक उन्हाने तापलेल्या शेतीला रोवणीसाठी आणखी मुसळधार पावसाची गरज आहे.
मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी थाटात खरीप हंगामाचा प्रारंभ केला. धडाक्यात धानाची पेरणी केली. आर्द्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांस हुरूप आला. आता पेरण्या आटोपून महिन्याचा कालावधी लोटला आहे. धानाची पऱ्हे रोवणीसाठी सज्ज आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांबरोबर कोरडवाहू शेतीचे पऱ्हेसुद्धा जोमदार आहेत. परंतु मागील दोन आठवड्यांपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. ऊन-सावल्यांच्या खेळात शेतकरी भरडला आहे. आता आठवड्याच्या तपानंतर पावसाचे आगमन झाले. परंतु अजूनही तापलेल्या शेतीची भूक शमलेली नाही. रोवणीसाठी पर्याप्त पाण्याचा साठ झालेला नाही. अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
बॉक्स
१२ तास विजेचा पुरवठा करण्याची मागणी
पाऊस थांबल्याने पिकांना अधिक पाण्याची गरज आहे. परंतु विद्युत विभागाकडून केवळ आठ तास विजेचा पुरवठा केला जात आहे. त्यातच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने केवळ सहा ते सात तासच विद्युत दिली जात असल्याने शेतकऱ्यांना कमालीची नाराजी आहे. शिवाय जळालेले विद्युत रोहित्र वेळेत दुरुस्त किंवा नवीन रोहित्र दिले जात नाही. यामुळेही शेतीचे नुकसान होत नाही. किमान १२ तास विजेची मागणी होत आहे.
बॉक्स
परिसरात जलजन्य आजाराची भीती
रिमझिम पावसाबरोबर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असल्याने विविध जलजन्य आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. डासांची पैदास वाढल्याने मलेरियाचा धोका वाढला आहे. कोरोना काळातही उल्टी, हगवन, सर्दी, ताप या आजारात वाढ झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहावयास मिळत आहे.
बॉक्स
भाजीपाल्याच्या दरात वाढ
खरीप पिकावर किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. धान पिकाबरोबर वेलवर्गीय पिके व भाजीपाला पिकेही प्रभावित झाली आहेत. विविध किडीने वांगे, टमाटर, कारले, भेंडी आदी व अन्य भाजीपाला पीक किडल्याने पिकांच्या उत्पादनावर परिणाम जाणवत असून भाजीपाला पिकांच्या दरात वाढ झालेली आहे.
170721\img_20210717_110850.jpg~170721\img_20210717_110320.jpg
पाऊस थांबल्याने करडी परिसरातील ५ हजार हेक्टर शेती पडीत~पाऊस थांबल्याने करडी परिसरातील ५ हजार हेक्टर शेती पडीत