आठवडाभरात ॲक्टिव्ह रुग्णात पाचने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:31+5:302021-07-24T04:21:31+5:30
भंडारा : जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असताना दररोज एक किंवा दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असून, आठवडाभरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ...
भंडारा : जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असताना दररोज एक किंवा दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असून, आठवडाभरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पाचने वाढून आता आठ झाली आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत नसली तरी वाढणारी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला.
गत महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या सिंगल डिजिटमध्ये येत आहे. गत २३ दिवसांत दहा दिवस रुग्णांची संख्या शून्य आली. आरोग्य विभागासाठी हा दिलासा ठरला. १९ जुलै रोजी जिल्ह्यात केवळ तीन ॲक्टिव्ह रुग्ण होते. मात्र, दुसऱ्या दिवशी दोन रुग्णांची भर पडली आणि रुग्णसंख्या पाचवर पोहोचली. तेथून रुग्णांची संख्या दररोज वाढत जाऊन शुक्रवारी जिल्ह्यात आठ ॲक्टिव्ह रुग्ण झाले आहेत.
शुक्रवारी ८४६ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात एक पॉझिटिव्ह आढळून आला. आता कोरोना रुग्णांची संख्या ५९ हजार ८०३ झाली आहे, तर ५८ हजार ६६५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनाच्या संसर्गापासून आतापर्यंत ११३० जणांचा बळी गेला आहे.
बॉक्स
सर्वाधिक ॲक्टिव्ह साकोलीत
जिल्ह्यात सद्य:स्थितीत सर्वाधिक चार ॲक्टिव्ह रुग्ण साकोली तालुक्यात आहेत. या तालुक्यात आतापर्यंत ७७१५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील १०५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर ७६०६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. भंडारानंतर सर्वाधिक रुग्ण साकोलीतच आढळून आले आहेत. सध्या भंडारा, तुमसर तालुक्यात प्रत्येकी दोन असे चार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.