तुमसर, साकोली तालुक्यातील पाच गावे दुष्काळग्रस्त घोषित
By admin | Published: April 12, 2017 12:46 AM2017-04-12T00:46:23+5:302017-04-12T00:46:23+5:30
जिल्ह्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आलेल्या तुमसर व साकोली तालुक्यातील पाच गावांमध्ये ...
आठ सवलती लागू : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
भंडारा : जिल्ह्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आलेल्या तुमसर व साकोली तालुक्यातील पाच गावांमध्ये जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी १० फेब्रुवारीच्या शासन निणर्यानुसार दुष्काळसदृष्य परिस्थिती घोषित केली. यामुळे या गावांमध्ये आठ प्रकारच्या सवलती लागु करण्यात आल्या आहेत.
या गावांमध्ये जमीन महसुलात सुट, कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सवलत, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहिर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे, रोहयोंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, सहकारी कर्जाचे पुनर्गठण अशा आठ सवलती या गावांना लागु करण्यात आले आहे.
दुष्काळ सदृष्य गावातील पीक नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मदत देताना ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिक विमा काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत मंडळनिहाय भरपाईची रक्कम देण्यात येईल. याशिवाय प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के मदत देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील चुल्हरडोह, आग्री, चिचोली व भोंडकी आणि साकोली तालुक्यातील नवेगाव (रिठी) या गावांचा दुष्काळ सदृष्य गावांमध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)