कोका अभयारण्यातून पाच लाकूड तस्करांना अटक
By admin | Published: November 29, 2015 01:30 AM2015-11-29T01:30:00+5:302015-11-29T01:30:00+5:30
कोका अभयारण्यातील सालेहेटी बिटातून आडजातीचे नऊ नगांची वाहनातून तस्करी करताना कोका अभयारण्यातील भरारी पथकाने सापळा रचून वनतस्करांना पकडले.
भंडारा/करडी : कोका अभयारण्यातील सालेहेटी बिटातून आडजातीचे नऊ नगांची वाहनातून तस्करी करताना कोका अभयारण्यातील भरारी पथकाने सापळा रचून वनतस्करांना पकडले. ही घटना शनिवारच्या पहाटे २ वाजता घडली. भरारी पथकाने वाहनासह पाच जणांना अटक केली असून एक जण फरार आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता या पाचही आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आले आहे.
कोका अभयारण्यातील सालेहेटी बीट क्रमांक १६४ मधून आडजात भेरा प्रजातीच्या लाकडांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती कोका अभयारण्यातील भरारी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३२ क्यू. ३२९६ हे वाहन रात्रीच्या सुमारास गस्तीदरम्यान अडविण्यात आले.
त्यानंतर या वाहनाची तपासणी केली असता त्यात भेरा प्रजातीची मोठमोठी नऊ लाकडे आढळून आली. या लाकडांची किंमत ५,५०० रूपये असल्याचे सांगण्यात आले. या वाहनातील सहा जणांची चौकशी केली असता त्यांनी ही लाकडे चोरीची असून सालेहेटी बीट क्रमांक १६४ मधून नेत असल्याचे सांगितले.
त्यावरून भरारी पथकाने वाहनचालक प्रशांत प्रभू मोहतुरे (३५) रा.माटोरा, सुखदेव भिवा मेश्राम (४६) रा.सितेपार, अंकुश दशरथ मोहनकर (३२) रा.माटोरा, हरिश्चंद्र विठ्ठल लुटे (४०) रा.माटोरा, विलास बाळकृष्ण रेहपाडे (२४) रा.माटोरा या पाच जणांना अटक करण्यात आली. तर बाळकृष्ण बाबुराव कामथे (२८) रा.माटोरा हा आरोपी फरार झाला. या आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शेडगे, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. मारबते, वन कर्मचारी जे.के. ढाले, सुरेश गोखले, वनरक्षक जी.एन. नागरगोचे, बी.एस. कदम, डी.एस. कौरकर, जे.एस. गणवीर, रामचंद्र उके, प्रकाश कुळमथे, अतुल शिंगाडे यांनी केली. (शहर प्रतिनिधी / वार्ताहर)