गांजा बाळगणाऱ्याला पाच वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 09:55 PM2018-12-15T21:55:39+5:302018-12-15T21:55:55+5:30
गांजा हा अमली पदार्थ अवैधरित्या बाळगल्याचा आरोप सिद्ध झाल्याने वरठी येथील एका २० वर्षीय तरुणाला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.सी. पांडे यांनी पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गांजा हा अमली पदार्थ अवैधरित्या बाळगल्याचा आरोप सिद्ध झाल्याने वरठी येथील एका २० वर्षीय तरुणाला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.सी. पांडे यांनी पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
हर्षद उर्फ शेरू राहुल मेश्राम (२०) रा.नेहरु वॉर्ड वरठी असे आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी शाखेचे तत्कालीन प्रभारी अधिकारी प्रकाश खोब्रागडे यांनी १३ आॅगस्ट २०१५ रोजी शेरूच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात एक किलो ६५ ग्राम गांजा आढळून आला होता. त्याच्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय.एच. किचक यांनी सुरु केला. आरोपीला अटक करण्यात आली. साक्षी पुरावे गोळा करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले.
येथील जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरु झाला. या गुन्ह्यात सरकारपक्षातर्फे अॅड.दुर्गा तलमले यांनी बाजू मांडली. गुन्ह्याचे स्वरुप व गंभीरता लक्षात घेऊन आरोपी शेरू मेश्राम याच्या विरुद्ध दोष सिद्ध झाल्याने अमली औषधी द्रव्य व मनोविकार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये पाच वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास देण्यात आला. सदर गुन्ह्यात पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार हर्षवर्धन मेश्राम यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.