पाच वर्षानंतरही उड्डाणपुलाचे बांधकाम अर्ध्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:47 PM2019-03-11T22:47:18+5:302019-03-11T22:47:37+5:30
देव्हाडी उड्डाणपूलाचे काम सुरू होवून पाच वर्षे पूर्ण झाली, परंतु केवळ ४२ कोटींचा पूल अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही. सध्या अर्ध्यावरच पूलाचे कामे झाली आहेत. एकीकडे निवडणुकीचा जोर वाढला असून उड्डाणपूलाची कामे संथगतीने सुरू आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी पूलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दररोज येथे वाहतूक कोंडी निर्माण होते. विकास कामांचा हाच धडाका काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी उड्डाणपूलाचे काम सुरू होवून पाच वर्षे पूर्ण झाली, परंतु केवळ ४२ कोटींचा पूल अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही. सध्या अर्ध्यावरच पूलाचे कामे झाली आहेत. एकीकडे निवडणुकीचा जोर वाढला असून उड्डाणपूलाची कामे संथगतीने सुरू आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी पूलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दररोज येथे वाहतूक कोंडी निर्माण होते. विकास कामांचा हाच धडाका काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मुंबई-हावडा महत्वपूर्ण रेल्वे मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून देव्हाडी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल मंजूर करण्यात आले. केंद्र सरकार व राज्य शासनाचा हा संयुक्त उड्डाणपूल आहे. केवळ ४२ कोटींचा हा भराव उड्डाणपूल आहे. सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल यांनी पुलाचे भूमिपूजन केले होते. तीन महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला येथे सुरूवात झाली. सन २०१९ ची लोकसभा निवडणूक आली तरी उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्णत्वास आले नाही.
सध्या केवळ ६० टक्के उड्डाणपूलाचे बांधकाम झाल्याचा दावा संबंधित विभाग करीत आहे. नोटबंदी तथा जीएसटीमुळे या पूलाचे बांधकाम किमान सहा ते आठ महिने रखडले होते. निधीची कमतरता येथे भासली. कासवगतीने कामे सुरू असताना याकडे कुणीच लक्ष दिले नाही.
अदानी वीज कारखान्यातील फ्लाय अॅश येथे भरावात घालण्यात आले. त्यामुळे स्थानिकांची डोकेदुखी वाढली. पोचमार्ग खड्डेमय बनले. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. सध्या पोचमार्गाची कामे सुरू करण्यात आली आहेत. रेल्वे सध्या दोन्ही बाजूला सिमेंटचे पिल्लर उभे करीत आहे. ही कामेही अत्यंत संथगतीने सुरू आहेत. संपूर्ण उड्डाणपूलांची कामे यंत्राने येथे सुरू आहेत तरी कामाची गती मात्र अतिशय मंद आहे. पाच वर्षात केवळ ४२ कोटींचा पूल बांधकाम पूर्णत्वास आले नाही हा संशोधनाचा विषय आहे.
सध्या या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे, परंतु राष्ट्रीय महामार्गाला साजेशा सोयी-सुविधा येथे दिसत नाही. केवळ वेळ मारून नेण्याचाच प्रकार येथे सुरू आहे.
वाहतुक कोंडीमुळे वाहनधारकांना मोठा त्रास येथे सहन करावा लागत आहे. रेल्वेचा वीज खांब येथील उड्डाणपूल खांबाला अडसर ठरत असल्याची माहिती आहे. याकरिता रेल्वेचे वीज अभियंते व स्थापत्य अभियंते या समस्येवर तोडगा काढत असल्याची माहिती आहे. अतिशय वर्दळीचा राष्ट्रीय महामार्गाची केवळ पोचमार्गावरून मागील पाच वर्षापासून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागते.