पक्ष्यांचे थवे झाले दिसेनासे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:51+5:302021-05-24T04:33:51+5:30
शहरी आणि ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी पक्ष्यांची संख्या मोठी होती. वडाच्या अथवा उंच पिंपळाच्या झाडावर पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसून ...
शहरी आणि ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी पक्ष्यांची संख्या मोठी होती. वडाच्या अथवा उंच पिंपळाच्या झाडावर पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसून यायचे. सायंकाळी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असायचा. चिऊताई, पोपट, राघू, बगळे असे विविध पक्षी या वृक्षांवरच मुक्काम ठोकायचे. सकाळी पक्ष्यांचे थवे दानापाण्याच्या शोधात निघताना पुन्हा किलबिलाट करायचे. तसेच घराच्या आत फिरण्याची हिम्मत केवळ चिमणी करायची. अनेकदा फोटोच्या मागे चिमण्यांचे खोपे असायचे. परंतु, आता पक्षी दिसेनासे झाले आहेत. मोबाइल टाॅवरपासून शहरी भागातील पक्षी रेडिएशनने दूर गेले आहेत. तर, शेतात फवारण्यात येणा-या कीटकनाशकांमुळे पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. कावळा आता पिंडाला शिवायलाही तयार नाही. तासनतास कावळ्याची प्रतीक्षा करूनही कावळा येत नसल्याने शेवटी तणाचा कावळा करून भागवावे लागत आहे.
बदलत्या युगात वैज्ञानिक क्रांतीने जग बदलले आहे. निसर्गापासून माणूस दूर जाऊन काँक्रिटच्या जंगलात राहावयास आला आहे. प्रगतीची शिखरे पादाक्रांत करताना सृष्टीचे चक्र विस्कळीत करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रदूषणाची समस्या आता शहरातच नाही तर ग्रामीण भागापर्यंतही पोहाेचली आहे. प्रदूषित वातावरणामुळे पक्षीही आता दिसत नाहीत. गिधाड तर नामशेष झाले आहेत. निसर्गाचा सफाई कामगार लुप्त झाल्याने मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तर, दैनंदिन डोळ्यांसमोर दिसणारे, संध्याकाळी आकाशात थव्याथव्यांनी फिरणारे पक्षी मात्र आता दिसेनासे झाले आहेत.