भंडारा शहरातील सहा शिबिरांत पूरग्रस्त आश्रयाला; दोन हजारांवर नागरिकांना दिले भोजन
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: August 17, 2022 12:38 AM2022-08-17T00:38:39+5:302022-08-17T00:39:04+5:30
भंडारा शहरात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून दोन हजार नागरिकांना मंगळवरी दिवसभरात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या सर्व पूरग्रस्तांसाठी शहरात सहा शिबिर लावण्यात आले आहे.
भंडारा : शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीने दोन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून सहा शिबिरांत त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक आमदार व नगरपरिषदेच्या मदतीने बचतगटाच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
भंडारा शहरात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून दोन हजार नागरिकांना मंगळवरी दिवसभरात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या सर्व पूरग्रस्तांसाठी शहरात सहा शिबिर लावण्यात आले आहे. नगरपरिषद गांधी विद्यालय, नगरपरिषद समाज भवन, कहार समाज भवन, वाल्मीकी समाज भवन, आयटीआय आणि आरटीओ कार्यालयात शिबिर लावण्यात आले आहे. येथे असलेल्या पूर ग्रस्तांसाठी भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर व नगरपरिषेने भोजनाची व्यवस्था केली आहे. भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या शिबिरांना भेट देऊन पाहणी केली.
यासोबतच ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने पूरग्रस्तांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील मुंढरी, भंडारा तालुक्यातील गणेशपूर आदी ठिकाणी शिबिर उघडण्यात आले आहेत.
वैनगंगेची पाणी पातळी २४८.३६ मीटर -
सध्याही वैनगंगेची पाणी पातळी वाढत असून कारधा येथे रात्री १० वाजता २४८.३६ मीटर पाणी पातळी नोंदविण्यात आली. धोका पातळी २४५.५० मीटर असून धोका पातळीच्या वर २.८६ मीटर पाणी वाहत आहे.