पूराचा फटका; पिकांसाठी ९६.९३ लाख रुपयांचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 01:07 PM2024-07-31T13:07:58+5:302024-07-31T13:15:49+5:30
चुलबंद, वैनगंगा नदीचा प्रकोप : शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : सन २०२३च्या खरीप हंगामात चूलबंद व वैनगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकाठावरील गावांतील हजारो हेक्टर क्षेत्रातील विविध खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानप्रकरणी शासन निर्देशानुसार क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी केली होती. या मागणीनुसार मागील वर्षी पुराच्या पाण्याने झालेल्या पिकांच्या नुकसानप्रकरणी शासनाकडून ९६.९३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मंजूर निधीअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाचे आवाहन स्थानिक महसूल प्रशासन अंतर्गत करण्यात आले आहे.
माहितीनुसार, मागील खरीप हंगामाच्या सुमारास जिल्ह्यातील गोसे खुर्द धरणातून अचानक मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यातील चूलबंद व वैनगंगा नदीला पूर आला होता. या पुराचे पाणी तालुक्यातील अंतरगाव, असोला, आथली, आवळी, चप्राड, डांबेविरली, गवराळा, विरली खुर्द, इटान कन्हाळगाव, केशोरी (खा), केशोरी (रयत), खैरी पट, किन्हाळा, लाखांदूर, मडेघाट, मेंढा, मोहरणा, नांदेड, सोनी, टेंभरी व विहीरगाव आदी २१ गावांतील शेतात शिरले होते.
या पुराच्या पाण्याने या गावांतील हजारो हेक्टर क्षेत्रातील विविध खरीप पिकांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी शासन निर्देशानुसार स्थानिक लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात तालुका प्रशासनाअंतर्गत क्षतिग्रस्त पिकांच्या ई-पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण करून शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी केली होती.
१ हजार ४८९ शेतकऱ्यांना फटका
नदीला आलेले पुराचे पाणी शेतात शिरल्याने खरीप पिकांच्या नुकसानप्रकरणी ई-पंचनाम्याची कार्यवाही करण्यात आली होती. या कार्यवाही अंतर्गत तालुक्यातील चूलबंद व वैनगंगा नदीकाठावरील तब्बल २१ गावांतील १ हजार ४८९ शेतकऱ्यांच्या विविध खरीप पिकांचे नुकसान झाले होते. त्यानुसार निधी मंजूर करण्यात आला आहे.
पवनी तालुक्यात मदतीपासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा-कोसरा : मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोसे धरणातील अतिरिक्त सोडलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदी काठाजवळील शेतीचे व ज्या ठिकाणी पुराचे पाणी गेले, त्या ठिकाणची शेती पूर्णपणे नष्ट झाली. त्या संबंधाने शासनाने मागील वर्षी अशा पूरपीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. त्यांची यादी बनवली. मागील वर्षी बनवलेली यादी यावर्षी प्रकाशित करण्यात आली; परंतु या यादीमध्ये कित्येक जणांची नावे समाविष्ट नाहीत. ते पूरपीडित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
पवनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची नावे सुटलेली आहेत. ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले व पुराचे पाणी शेतामध्ये शिरले होते. अशा
असाच प्रकार गावागावांमध्ये दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. नदीकाठच्या असंख्य गावांमध्ये पुरामुळे बुडलेल्या शेतीचे सर्वेक्षण बरोबर करण्यात आले नसल्याचे दिसून येते.
एकदा यादी बनल्यानंतर या यादीतून इतर नावे का गाळली जातात, यावर मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण बरोबर केले नसल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या शेतकऱ्यांची मागील वर्षाच्या पूरबुडीच्या यादीत नावे नाहीत त्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, त्वरित यादी बनवण्यात यावी, अशी मागणी पूरपीडित शेतकऱ्यांनी केली आहे.