संततधार पावसामुळे लाखांदूर नगरात पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:23 AM2021-07-09T04:23:30+5:302021-07-09T04:23:30+5:30
हवामान खात्याने बुधवार व गुरुवारी संततधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. बुधवारी सायंकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. रात्रीच्यासुमारास उसंत घेतल्यानंतर गुरुवारी ...
हवामान खात्याने बुधवार व गुरुवारी संततधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. बुधवारी सायंकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. रात्रीच्यासुमारास उसंत घेतल्यानंतर गुरुवारी पहाटेपासूनच दुपारी १ पर्यंत संततधार पाऊस कोसळला. या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामातील धान रोवणीच्या कामात व्यस्त झाला असून, कोरडे पडलेली नदी, नाले आता भरले असल्याने ग्रामीण भागातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. मात्र लाखांदूर येथील तीन प्रभागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एका माजी नगरसेविकेचा समावेश आहे. बाबू शेख, सुखराम टेंभुरकर, विठ्ठल मेश्राम, कुंदा पुरामे, रामदास कापगते, लालाजी मिसार यांच्या घरात दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे दिसून आले.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डाॅ. सौरभ कावळे यांनी सकाळी १० च्यासुमारास पावसातच कर्मचाऱ्यांसह या प्रभागांची पाहणी केली व येथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी असे निदर्शनास आले की, साकोली-वडसा महामार्गाची उंची वाढल्याने व माजी नगरसेविका वनिता लालाजी मिसार यांच्या घरामागील मोठी गटार बुजली आहे. त्यामुळे घरांमध्ये पाणी घुसल्याचे सांगण्यात आले. यासह लाखांदूर नगरात असलेल्या गटारी या ग्रामपंचायत काळातील असल्याने छोट्या आहेत. तसेच रस्त्यांची उंची वाढल्याने गटारांची उंची कमी होत चालली आहे.
चार महिन्यांंपूर्वीच लाखांदूर नगरपंचायतीचा कार्यकाळ संपला असून, लाॅकडाऊन काळामुळे निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे नगरपंचायतीचा संपूर्ण कारभार मुख्याधिकारी डाॅ. सौरभ कावळे पाहत आहेत. एकीकडे नगरपंचायत प्रशासन करोडो रुपयांची विकासकामे केली असल्याचा कांगावा करीत असताना, पूरपरिस्थिती निर्माण झाली कशी?, केलेला विकास कुठे दडला, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षीचा हा पहिलाच मोठा पाऊस असताना दोन प्रभागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर जर मोठा पाऊस पडल्यास काय होणार, हादेखील चिंतेचा विषय ठरला आहे.
प्रतिक्रिया :
१. "आमच्या संपूर्ण प्रभागातील पाणी गटारीच्या माध्यमातून वाहून जाण्याचा मोठा नाला एका महिलेने उन्हाळ्यामध्ये बुजविला असल्यामुळे पहिल्यांदा या वाॅर्डात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या नाल्याचा उपसा केल्यास अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची मला खात्री आहे."
- वनिता लालाजी मिसार, माजी नगरसेविका
२. "नगरपंचायतीवर पाच वर्षे भाजपची एकहाती सत्ता होती. आम्ही पाच वर्षे सत्तारूढ पक्षाला नगरातील १७ प्रभागांतील विविध समस्या मांडल्या होत्या. मात्र सत्तारूढ़ पदाधिकाऱ्यांनी आमचे ऐकले नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उद्धभवली आहे."
- रामचंद्र राऊत, माजी गटनेता
३. "संपूर्ण लाखांदूर नगरात हे दोन प्रभाग खूपच खाली असून, घरे ही नाल्यालगत आहेत. जेव्हा जेव्हा संततधार किंवा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा पाणी बाहेर निघण्याचा मार्ग नसल्याचे अशी परिस्थिती उद्भवते. अशी परिस्थिती येऊ नये यासाठी आम्ही पाच वर्षे परिश्रम घेतले आहेत. ज्या ठिकाणाहून पूर्ण पाणी निघू शकते, तिथे पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवणार नाही."
- विनोद ठाकरे, मा. गटनेता
080721\img-20210708-wa0064.jpg
राखेची वाहतूक होताना अशी उडते धूळ