वैनगंगेचा प्रवाह थांबला, उन्हाळ्यात पात्र होणार कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:35 AM2021-03-20T04:35:11+5:302021-03-20T04:35:11+5:30

तुमसर : तालुक्याची जीवनदायी वैनगंगा नदीचा प्रवाह मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच थांबला. आता उन्हाळ्यातील तीन महिन्यात नदीपात्र कोरडे राहणार ...

The flow of the Waingange stopped, becoming dry in the summer | वैनगंगेचा प्रवाह थांबला, उन्हाळ्यात पात्र होणार कोरडे

वैनगंगेचा प्रवाह थांबला, उन्हाळ्यात पात्र होणार कोरडे

Next

तुमसर : तालुक्याची जीवनदायी वैनगंगा नदीचा प्रवाह मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच थांबला. आता उन्हाळ्यातील तीन महिन्यात नदीपात्र कोरडे राहणार असून तीरावरील गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मोठा फटका बसणार आहे. अनेक गावांत भीषण पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कवलेवाडा बॅरेजचे पाणी नदीपात्रात साेडण्याची गरज आहे.

बारमाही वाहणारी वैनगंगा नदी अलीकडील काही वर्षांपासून उन्हाळा सुरू होताच कोरडी पडायला लागते. नदीचे रूपांतर वाळवंटात होते. नदी कोरडी पडली की अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांना घरघर लागते. ही जलसंकटाची चाहूल मानली जात आहे. विस्तीर्ण नदीपात्र आतापासूनच वाळवंटासारखे दिसत आहे.

कवलेवाडा येथे धापेवाडा उपसा सिंचन योजना व ऊर्जा प्रकल्प यांच्या संयुक्त बॅरेज आहे. वैनगंगा नदीचा प्रवाह येथे अडविण्यात आला आहे. बॅरेजच्या पलीकडे अथांग जलसाठा आहे. परंतु प्रकल्पाच्या पुढील भागात नदीपात्र कोरडे पडते. नदीच्या पाण्याचा उपयोग प्रथम पिण्यासाठी, नंतर शेती आणि शेवटी उद्योगासाठी करण्यात यावा असा नियम आहे. कवलेवाडा बॅरेजचे पाणी शेती व उद्योगासाठी वापरण्यात येत आहे. ऊर्जा प्रकल्प शासनाला पाण्याचे पैसे देते. परंतु नदीपात्र कोरडे होत असल्याने पाणी वापरण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नदीपात्र कोरडे होऊ नये याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने अनेक जलचर प्राण्यांचा येथे मृत्यू होतो. पर्यावरणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमबाह्य रेती उपशामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदी बचावसाठी अनेक नियम आहेत. परंतु ते केवळ कागदावर दिसतात. सध्या बॅरेज द्वारातून अत्यंत कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. नाममात्र पाणी विसर्गामुळे उन्हाळ्यात मात्र नदीचा प्रवाह बंद होतो. नदीपात्र विस्तीर्ण असल्यामुळे पुढचा प्रवाह बंद होतो.

मासेमारीला फटका

वैनगंगा नदीपात्र विस्तीर्ण असल्यामुळे व पाण्याची उपलब्धता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करण्यात येते. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाह बंद पडल्याने मासेमारीला येथे फटका बसतो. कवलेवाडा बॅरेजमध्ये जलसाठा झाल्याने तिथे मात्र मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते.

बॅरेजनंतर नदीपात्र कोरडे असल्याने उन्हाळ्यामध्ये कोळी बांधवांना मासेमारीचा फटका बसतो. केवळ नदीतील खोलगट भागात जमा असलेल्या पाण्यातच मासेमारी करता येते. त्यातून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. कोळी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कुणी पुढे यायला तयार नाही.

Web Title: The flow of the Waingange stopped, becoming dry in the summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.