उड्डाणपूल भरावातील फ्लायअॅशला पाण्याचा मुलामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:42 AM2018-11-16T00:42:03+5:302018-11-16T00:43:12+5:30
मानवी आरोग्याला अतिशय धोकादायक फ्लायअॅशला (राख) सध्या पाण्याचा मुलामा देण्यात येत आहे. उड्डाणपूल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लायअॅश भरणे सुरु आहे. रस्त्यावरील पडलेली धूळ अजूनपर्यंत कंत्राटदाराने उचल केली नाही.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मानवी आरोग्याला अतिशय धोकादायक फ्लायअॅशला (राख) सध्या पाण्याचा मुलामा देण्यात येत आहे. उड्डाणपूल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लायअॅश भरणे सुरु आहे. रस्त्यावरील पडलेली धूळ अजूनपर्यंत कंत्राटदाराने उचल केली नाही. येथे कंत्राटदार व संबंधित खात्याचे अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही येथे दुर्लक्ष दिसत आहे.
देव्हाडी येथे तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर उड्डानपुलाचे काम मागील चार वर्षापासून संथगतीने सुरु आहे. गोंदिया व तुमसर मार्गावर अॅप्रोच रस्ता तयार केला जात आहे. येथे अदानी वीज कारखान्यातील फ्लाय अॅशचा वापर भरावाकरिता केला जात आहे. पीठासारखी अॅश ट्रकमधून सरावाकरिता घालतांना मोठा धुराळा उडतो. रेल्वे फाटकाजवळ शेवटचा भराव करतांना कंत्राटदाराने पाण्याचा मुलामा देण्याचा केविलवाना प्रयत्न सुरु आहे. फाटकाशेजारी दूचाकी, चारचाकी वाहने उभी राहतात. फ्लाय अॅशचा धूराळा उडू नये म्हणून तात्काळ पाणी मारण्यात येत आहे. उर्वरित ठिकाणी पाणी मारले जात नाही. येथील दोन्ही बाजूच्या पर्यायी रस्त्यावर फ्लाय अॅशचा थर अजूनही पडून आहे. कंत्राटदाराचे येथे मागील अनेक महिन्यापासून दुर्लक्ष होत आहे.
उड्डाणपूलाचे मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे. त्यामुळे येथे नियमित अधिकारी येत नाही. परिणामी कंत्राटदाराचे फावत आहे. भेटीकरिता व निरीक्षणाकरीता वरिष्ठ अधिकारी येतात व निघून जातात. पर्यायी पोचमार्ग व इतर सुविधा पूरविण्याचा, खड्डे बुजविण्याचे, रस्त्याची देखभाल करण्याचे नियम आहे, परंतु येथे नियमाकडे कायम दुर्लक्ष दिसत आहे. पर्यायी रस्ता अक्षरश: खड्डेमय झाला आहे. किमान खड्डे बुजविण्याचे सौजन्य येथे दाखविण्यात येत नाही. यासंदर्भात जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा या उड्डाणपूलाशी संबंध नाही, नागपूर येथील मुख्यालयातून नियंत्रण सुरु आहे.
सुमारे २४ कोटी रुपये किंमतीचा उड्डाणपूल असून जबाबदार अधिकाऱ्यांची येथे वाणवा दिसत आहे. प्रवाशांना येथून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. पर्यायी रस्ता ही अरुंद असल्याने व राखेचा धुरामुळे रस्ता दिसत नसल्याने वाहने अंदाजानेच पुढे न्यावे लागते.
जिल्हाधिकाऱ्यांनी येथे गंभीर दखल घेण्याची गरज आहे. पर्यावरणाला धोक्यासोबतच नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. संथगतीने कामामुळे येथे डोकेदुखी वाढली आहे. रहदारी वाढल्यानेच येथे उड्डाणपूल मंजूर करण्यात आले होते.