देव्हाडी येथे उड्डाणपूल पोचमार्गावरील खड्डे ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:15 PM2018-12-01T22:15:25+5:302018-12-01T22:15:41+5:30
रस्त्यावरील वळणमार्ग धोकादायक स्थितीत कदापी राहू नये असे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते मंत्रालयाने दिले आहे. परंतु देव्हाडी येथील उड्डाणपुल पोचमार्ग वळणावरील खड्डे बुजविण्याकरिता बारीक दगडी चुरी रस्त्यावर घालण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रस्त्यावरील वळणमार्ग धोकादायक स्थितीत कदापी राहू नये असे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते मंत्रालयाने दिले आहे. परंतु देव्हाडी येथील उड्डाणपुल पोचमार्ग वळणावरील खड्डे बुजविण्याकरिता बारीक दगडी चुरी रस्त्यावर घालण्यात आली आहे. चुरीवरून दुचाकी अनियंत्रित होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. रात्री अंधारात अपघातात वाढ होत आहे. पोचमार्गावरील खड्ड्यांची स्थिती जैसे थे असून थातूरमातूर खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न येथे सुरु आहे.
तुमसर-गोंदिया राज्य मार्ग नुकताच राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित आला आहे. देव्हाडी येथे २४ कोटींचा उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु आहे. तुमसर व गोंदिया रस्त्यावर पोचमार्ग तयार करण्यात आला. काही दिवसातच पोचमार्ग खड्डेमय झाला. खड्ड्यात येथे गिट्टी भरून बुजविण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला. अतिशय वर्दळीचा रस्त्यामुळे उड्डाणपुल येथे मंजूर करण्यात आले. पोचमार्गाचे काम गुणवत्तापूर्वक येथे झाले नाही. त्यामुळे दोन्ही पोचमार्गावर धोकादायक खड्डे तयार झाले आहेत. पोच मार्गावर फ्लाय अॅश पसरल्याने वाहने गेल्याने धुळ सतत उडते. त्यामुळे वाहनधारकांना समोरचे दिसत नाही. खड्ड्यांमुळे येथे अनेक लहान अपघात घडले आहेत. येथे धुळीमुळे व्हीजीबिलीटी अतिशय कमी राहते हे विशेष.
शिवसेनेच्या वाहतूक शाखेने संबंधित विभागाला तथा तहसीलदारांना याबाबत निवेदन देऊन तक्रार केली. परंतु त्याची दखल अजूनपर्यंत घेतली नाही. जीव मुठीत घेऊन सदर रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मागील चा वर्षापासून वाहतूक कोंडी व खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
कंत्राटदाराने उड्डाणपुलाजवळील (खापा-देव्हाडी) वळणमार्गावर दगडी चुरी टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. पोचमार्गावरील खड्डे केव्हा बुजविणार असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. उड्डाणपुलाचे कामे सुरु होऊन येथे चार वर्षे लोटली. परंतु रस्त्याच्या दर्शनी भागावर अजूनपर्यंत कामांचे माहितीचे फलक लावण्यात आले नाही. उड्डाणपुलाची किंमत, लांबी, कामाचे आदेश केव्हा मिळाले, उड्डाणपुलाचे काम केव्हा पूर्ण होणार याबाबत काहीच माहिती नाही. सूचना फलक का लावले नाही हा संशोधनाचा विषय आहे.
दोन्ही बाजूच्या पोचमार्गावरील खड्डे बुजविणे, कारमेट रस्ता तयार करणे येथे गरजेचे आहे. येथे कंत्राटदाराने संबंधित विभागाला संपूर्ण धड्डे बुजविण्याची व रस्ता तयार करण्याची परवानगी मागितल्याचे समजते. परंतु पोचमार्ग तयार करणे, त्याची दुरुस्ती करणे ही कामे कंत्राटदारांच्या करारनाम्यातच सुरुवातीलाच असतात. येथे परवानगी मागण्याची गरज काय? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ वेळ मारून नेण्याचा येथे प्रकार सुरु असल्याचे दिसून येते.