दगाबाजीकडे लक्ष केंद्रित!
By admin | Published: November 18, 2016 12:32 AM2016-11-18T00:32:04+5:302016-11-18T00:32:04+5:30
भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवारला मतदान होत आहे. या निवडणुकीचा प्रवास जसजसा अंतिम टप्प्याकडे वळत आहे,
भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक : सर्वोच्च न्यायालयाने पवनीचे सात नगसेवक अपात्र
भंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवारला मतदान होत आहे. या निवडणुकीचा प्रवास जसजसा अंतिम टप्प्याकडे वळत आहे, तसतशी उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. एक-एक मताची गोळाबेरीज लावत असताना एकाही मतदाराकडून दगाफटका होऊ नये, याची काळजी उमेदवारांसह पक्षाकडून घेण्यात येत आहे.
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे विश्वासू राजेंद्र जैन हे राष्ट्रवादीचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय डॉ.परिणय फुके हे भाजपचे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे समर्थक प्रफुल अग्रवाल हे काँग्रेसचे उमेदवार असून अन्य पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत उमेदवारांसह दिग्गजांनी आपलाच उमेदवार विजयी व्हावा, यासाठी व्युहरचना आखली आहे.
या निवडणुकीत ३९५ एवढी मतदार संख्या आहे. यात भंडारा जिल्ह्यातील भंडारा जिल्हा परिषदेचे ५२ सदस्य, पंचायत समितीचे ७ सभापती, भंडारा नगर परिषदेचे ३५ सदस्य, तुमसर नगर परिषदेचे २५ सदस्य, पवनी नगर परिषदेचे १९ सदस्य, मोहाडी नगर पंचायतीचे १९ सदस्य, लाखनी नगर पंचायतीचे १९ सदस्य, लाखांदूर नगर पंचायतीचे १९ सदस्य असे भंडारा जिल्ह्यातील १९५ मतदार आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया जिल्हा परिषदेचे ५३ सदस्य, पंचायत समितीचे ८ सभापती, गोंदिया नगर परिषदेचे ४५ सदस्य, तिरोडा नगर परिषदेचे १९ सदस्य, गोरेगाव नगर पंचायतीचे १९ सदस्य, सडकअर्जुनी नगर पंचायतीचे १९ सदस्य, देवरी नगर पंचायतीचे १९ सदस्य, अजुर्नी (मोरगाव) नगर पंचायतीचे १९ सदस्य असे २०० स्थानिक प्राधिकारी संस्थेचे सदस्य मतदार आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने भंडारा जिल्हाधिकारी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा निर्णय कायम ठेऊन गुरूवारला दुपारी पवनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रजनी मोटघरे यांच्यासह नरेश बावनकर, तुळशिदास वंजारी, हिरा मानापुरे, अविना मुंडले, सुरेखा देशमुख, माया खापर्डे या सात नगरसेवकांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे मतदारसंख्या ३८८ इतकी होणार आहे. यापूर्वी ही संख्या ३९५ इतकी होती.
दरम्यान, शुक्रवार १९ नोव्हेंबरला होणाऱ्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीत या सातही नगरसेवकांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे हे नगरसेवक ज्या पक्षाच्या गोटात मागील १२ दिवसांपासून आहेत, त्या पक्षात कमालिची अस्वस्थता पसरली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर विजयाची मदार
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२४, भाजपकडे ११९, काँग्रेसकडे १०५ अशी एकूण मतदार संख्या आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षाच्या मतांची संख्या एक दुसऱ्याच्या संख्येत कमीअधिक प्रमाणात बरोबरीत दिसून येत आहे. त्यामुळे या पक्षांनी शिवसेनेचे २२ आणि अपक्ष २५ मतदारांची मोट बांधली आहे. परंतु शिवसेनेचे ७ नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यामुळे त्यांना या निवडणुकीपासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान, मतदान शनिवारला होत असून कोणत्या पक्षाने कोणत्या पक्षाची मते फोडली आणि कोण निवडून येईल, याकडे नजरा लागलेल्या आहेत.
केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष
विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवारला मतदान होत असून शुक्रवारला माजी आमदार स्व.राम आस्वले यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात केंद्रीय भूतल परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे भंडाऱ्यात येत आहेत. श्रद्धांजली कार्यक्रम असला तरी त्यांच्या दौऱ्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण राहतील, हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून येणार आहे.
मतदार संख्या घटणार
पाच वर्षांपूर्वी पवनी नगर पालिकेत शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या १३ नगरसेवकांपैकी ७ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळविणी करून सत्ता स्थापन केली. शनिवारला भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. दरम्यान, हे सातही मतदार ज्यांच्याकडे आहेत, त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी मतदार संख्या घसरणार असल्यामुळे संबंधित राजकीय पक्षाला मतदार संख्या जुळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.