आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे
By admin | Published: August 21, 2016 12:23 AM2016-08-21T00:23:34+5:302016-08-21T00:23:34+5:30
गत पाच दिवसांपासून १६ तास भारनियमनाच्या विरोधात वीज वितरण कार्यालयासमोर सुरू असलेले ...
आता १२ तासांचे भारनियमन : खासदार, आमदारांची उपोषण मंडपाला भेट
साकोली : गत पाच दिवसांपासून १६ तास भारनियमनाच्या विरोधात वीज वितरण कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपाला खासदार नाना पटोले व आमदार राजेश काशीवार यांनी भेट देवून उद्यापासून १२ तासांचे भारनियमन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
दरम्यान आज शेतकऱ्यांनी शासनाच्या व भारनियमनाच्या विरोधात नारेबाजी करीत साकोली व सेंदुरवाफा या गावातून शासनाची अंत्ययात्रा मोर्चा काढला. यावेळी सुनिल फुंडे यांनी निवडणुकीपुर्वी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज करणाऱ्या भाजप सरकारला आता शेतकऱ्याची परिस्थिती दिसत नाही. १६ तासाचे भारनियमन करून शेतकऱ्यांना संपवण्याचा भाजपाचे हे कटकारस्थान आहे.
मागील दोन महिन्यापासून शेतकरी भारनियमन बंद व्हावे यासाठी धावपळ करीत आहेत. विज वितरण कार्यालयासमोर १६ पासून १६ तासाचे भारनियमन बंद करण्यात यावे, यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आंदोलनात अविनाश ब्राम्हणकर, अंताराम खोटेले, राम महाजन, हरीभाऊ खोटेले, रामचंद्र कापगते, दुर्वास कापगते, सुरेशसिंह बघेल, गोवर्धन कापगते, रामदास कापगते, बाबुराव कापगते, प्रकाश शिवणकर, अभिमन चुटे, यशवंत ब्राम्हणकर, मारोती कापगते हे शेतकरी पाचव्या दिवशीही आमरण उपोषणाला बसले होते.
आज अंत्ययात्रा मोर्चा निघणार म्हणून तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने साकोली येथील उपोषणस्थळी पोहचले व दुपारी १२ वाजेदरम्यान वाज्या गाज्यासह अंत्ययात्रा मोर्च्याला सुरवात झाली. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. या मोर्च्यात आंदोलनकर्ते शेतकऱ्यासह मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, हेमकृष्ण वाडीभस्मे, रामू लांजेवार, अशोक कापगते, नरेंद्र वाडीभस्मे, प्रविण भांडारकर, नंदू समरीत, अश्विन नशीने, रामचंद्र कोहळे, डॉ. अजय तुमसरे, नरेश करंजेकर, छाया पटले यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते. मोर्च्यानंतर खासदार, आमदारांनी उपोषण मंडपाला भेट देवून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर उपोषणाची रितसर सांगता करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)