जिल्ह्यातील १२ लाख ३३४ लोकांची अन्नसुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:34 AM2021-01-20T04:34:51+5:302021-01-20T04:34:51+5:30
भंडारा :अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यासाठी अन्न व औषध निरीक्षकांची एकूण आठ पदे मंजूर आहेत. ...
भंडारा :अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यासाठी अन्न व औषध निरीक्षकांची एकूण आठ पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात चारच पदे कार्यरत असून चार पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील १२ लाख ३३४ लोकांची अन्नसुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात भंडारा शहरासह ६२१ मेडिकल स्टोअर्स आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात एकूण १,३३८ मेडिकल स्टोअर्स आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने एकूण चार औषध निरीक्षक यांची पदे मंजूर केली आहेत. मात्र प्रत्यक्षात भंडारा कार्यालयात औषध निरीक्षकांचे एकच पद कार्यरत असून एक पद रिक्त आहे. हीच अवस्था अन्न निरीक्षकांची आहे. भंडारा जिल्ह्यात २४८ हॉटेल आहेत. येथे एकच अन्न निरीक्षकांचे पद कार्यरत असून एक पद रिक्त आहे.त्यामुळे कामाचा ताण अधिक असल्याने अनेकदा तपासणीकडेही दुर्लक्ष होते. कोरोना काळात औषध निरीक्षकांकडून कारवाई करण्यात आली. मात्र तरीही अनेक मेडिकल विक्रेते चढ्या दराने विक्री करीत होते. इतकेच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही काहीजण छुप्या पद्धतीने न देता येणाऱ्या औषधांची विक्री करीत होते. यासाठी शासनाने रिक्त पदे त्वरित भरणे गरजेचे आहे. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या विचारात घेता हॉटेलची संख्याही वाढत आहे. केंद्र शासनाने हॉटेल तसेच बेकरीमध्ये विक्रीसाठी असणाऱ्या विविध पदार्थांवर बेस्ट बीफोर असणे आवश्यक केले आहे. मात्र असे असले तरीही शहरात मात्र अन्न प्रशासन विभागाकडून कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांचे मनोबल वाढत आहे. अनेक जण मुदत संपून गेलेले पदार्थही विक्रीस ठेवतात. यावर कारवाई होण्याची गरज आहे. हॉटेलांची अधूनमधून तपासणी करण्याची गरज आहे. मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्रीसाठी असलेले दिसून येत आहेत.
बॉक्स
हॉटेलमधील बेस्ट बीफोर नावालाच
भंडारा शहरासह अनेक तालुक्याच्या ठिकाणी हॉटेल तसेच बेकरीमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या पदार्थांची मुदत संपूनही तसेच विक्रीला ठेवले जातात. प्रशासनाची कारवाई होत नसल्याने यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतकेच नव्हे तर काही हॉटेल चालकांनी बेस्ट बीफोर लिहिले नसल्याचेही पाहणी दरम्यान दिसून आले. भंडारा शहरात तरी मिठाईच्या दुकानात याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
बॉक्स
अपवादात्मक होते मेडिकल्सची तपासणी
जिल्ह्यासाठी दोन औषध निरीक्षकांची पदे मंजूर असून केवळ एकच पद भरलेले आहे. जिल्ह्यात ६२१ मेडिकल आहेत. मेडिकलची कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तपासणी करण्यात आली होती. मात्र पदे रिक्त असल्याने कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे अनेकदा तपासणीकडे दुर्लक्ष होते.
जुलै २०२० ते आजच्या तारखेपर्यंत १५ कारवाया करण्यात आल्या. यामध्ये तीन मेडिकलचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले, तर इतर मेडिकल स्टोअर्सवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अनेकदा अचानक तपासणी करण्यात येते.
प्रशांत रामटेके, औषध निरीक्षक भंडारा.