बनावट विदेशी दारु कारखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 09:31 PM2018-07-29T21:31:47+5:302018-07-29T21:32:26+5:30
नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल आदी आढळून आले. पोलिसांनी एका तरुणाला याप्रकरणी अटक केली आहे.
Next
ठळक मुद्देउर्सरागोंदी येथे धाड : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, नामवंत कंपन्यांची नक्कल झाली उघड
<p>लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल आदी आढळून आले. पोलिसांनी एका तरुणाला याप्रकरणी अटक केली आहे.
लोकेश वासुदेव निंबार्ते (२८) रा. उर्सरागोंदी असे बनावट दारु निर्मिती करणा-याचे नाव आहे. सणांच्या निमित्ताने भंडारा तालुक्यातील उर्सरागोंदी परिसरात अनेक दिवसांपासून बनावट दारु निर्मिती होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार रविवारला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रविवारी धाड मारली.
यावेळी विक्रीसाठी तयार केलेल्या मध्यप्रदेश राज्यात निर्मित व तेथेच विक्रीला असलेल्या सिल्व्हर झेड विस्की तसेच त्यापासून महाराष्टÑातील नामांकित ब्रॉण्डच्या विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल असा एक लाख १४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी लोकेश निंबार्ते याला अटक करण्यात आली. त्याच्या विरुध्द महाराष्टÑ दारुबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग याप्रकरणी अधिक तपास करीत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त उषा शर्मा, भंडाराचे अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी कदम, सहायक दुय्यम निरीक्षक अरविंद कोटांगले, संजय कोवे, विनय हरिणखेडे, मंगेश ढेंगे, सविता गिरीपुंजे यांनी पार पाडले.
जिल्ह्यात बनावट दारुचा शिरकाव
गावठी दारु पाठोपाठ आता जिल्ह्यात बनावट दारुनेही शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. नामवंत कंपन्यांच्या ब्रॅण्डची नक्कल करुन ही दारु विकली जाते. दिसायला हुबेहुब असल्याने अट्टल दारु पिणाऱ्यांनाही ही बाब लक्षात येत नाही. परंतु या बनावट दारुमधील विषारी घटकांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही एक कारवाई केली असली तरी जिल्ह्यात असे अनेक कारखाने असण्याची शक्यता आहे.