बालवधूशी विवाह केल्यास दोन वर्षे सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 11:43 AM2024-11-18T11:43:27+5:302024-11-18T11:44:11+5:30
प्रशासनाची करडी नजर : सहभागींवरही गुन्हे दाखल होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये बालविवाह लावणे किंवा १८ वर्षांखालील मुलींचे विवाह लावणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार दोन वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे. असे असताना जिल्ह्यात बालविवाह होत असल्याची बाब अनेकदा पुढे येत असते. जिल्ह्यात गत दोन वर्षांत अनेक बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. तुळशी विवाहानंतर जिल्ह्यात लग्नसोहळ्यांना सुरुवात होत असते. बालविवाह लावणे अजामीनपात्र गुन्हा आहे. जिल्ह्यात या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी घोषित केले आहे.
तसेच शहरी भागासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. बालविवाह झाल्यास संबंधित वर, वधूचे आई, वडील किंवा पालक, अन्य नातेवाईक, मित्र परिवार, बालविवाह होणाऱ्या ठिकाणांचे विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटिंग प्रेस, वाजंत्री, सभागृह व्यवस्थापक, कॅटरर्स सोबतच ज्यांनी हा विवाह घडविण्यासाठी प्रत्यक्षात मदत केली किंवा असा विवाह न होण्यासाठी प्रयत्न केले नाही, जे विवाहात सहभागी झालेले असतील, अशा सर्वांवरदेखील शिक्षा होऊ शकते.
ग्रामसेवकाने जर जन्मदाखल्याची खोटी नोंद केली तर त्याच्यावरदेखील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने केले आहे.
अशी आहे शिक्षेची तरतूद
कायद्यानुसार १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास संबंधित पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्तमजुरीची कैंद आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यांसोबतच असे विवाह पार पाडणारे किंवा प्रोत्साहन देणाऱ्यांनादेखील दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरी कैद व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.