वनक्षेत्र सहाय्यकाची गळफास घेऊन आत्महत्या; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीला बोलाविल्याचा धसका
By ज्ञानेश्वर मुंदे | Updated: August 31, 2022 15:16 IST2022-08-31T14:56:53+5:302022-08-31T15:16:44+5:30
तुमसर तालुक्यातील गायमुख जंगलातील घटना

वनक्षेत्र सहाय्यकाची गळफास घेऊन आत्महत्या; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीला बोलाविल्याचा धसका
भंडारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी बोलाविल्याचा धसका घेत वनक्षेत्र सहाय्यकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तुमसर तालुक्यातील गायमुख जंगलात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
अजाबराव सीताराम लोहारे (५२) रा. परसोडी ता. उमरेड जि. नागपूर असे मृताचे नाव आहे. ते तुमसर तालुक्यातील लेंडझरी वनपरिक्षेतांर्गत विटपूर बिटमध्ये क्षेत्र सहाय्यक म्हणून कार्यरत होते. अजाबराव लोहारे बुधवारी सकाळी आपल्या कर्तव्यावर गेले. मात्र त्यांचा मृतदेह गायमुख जंगलातील खैराच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती वन विभागासह त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. आंधळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची तक्रार त्यांचा मुलगा मनीष अजाबराव लोहारे यांनी आंधळगाव ठाण्यात दिली.
भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागने २५ ऑगस्ट रोजी लेंडेझरी येथे लाच घेताना दोन वनरक्षकांसह चौघांना रंगेहात पकडले होते. रेतीचा टॅक्टर सोडविण्यासाठी १५ हजाराची लाच घेताना कारवाई करण्यात आली होती. या कारवाई संदर्भात अजाबराव लोहारे यांना सोमवार २९ ऑगस्ट रोजी भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलाविले होते. त्याचा धसका घेत त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचा मुलगा मनीष लोहारे याने आंधळगाव ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश मट्टामी करीत आहेत.