वनविभाग ‘जय’च्या तर पोलीस नक्षलवाद्यांच्या शोधात
By admin | Published: August 2, 2016 12:29 AM2016-08-02T00:29:35+5:302016-08-02T00:31:27+5:30
सध्या साकोली तालुक्यात वनविभाग व पोलीस प्रशासनाची शोधमोहिम जोरात सुरु आहे.
शोधमोहीम सुरूच, सुगावा लागेना : राज्यातील वन अधिकारी-कर्मचारी काढताहेत जंगल पिंजून
संजय साठवणे साकोली
सध्या साकोली तालुक्यात वनविभाग व पोलीस प्रशासनाची शोधमोहिम जोरात सुरु आहे. वनविभाग जयच्या शोधात तर पोलीस प्रशासन नक्षलवाद्याच्या शोधात रात्रंदिवस फीरत आहेत. मात्र वनविभागाला जय चा शोध लागला नाही तर पोलिसांना नक्षलवाद्यांचा शोध लागला नाही. कोट्यवधीचा खर्च झाला व होतच आहे मात्र शोध पथक शोधकार्यात व्यस्तच आहेत.
मागील चार महिन्यापासुन वनविभाग जय या वाघाच्या शोधात आहेत. जय हा उमरेड कऱ्हांडला या राष्ट्रीय व्याघ्रप्रकल्पातून बेपत्ता झाला. या जयच्या बाबतीत अनेक चर्चा सुरु आहेत. कुणी म्हणतात जय इकडे गेला असेल तर कुणी म्हणतात तिकडे गेला असेल जशी माहिती वनविभागाला मिळते त्याच दिशेने वनविभाग जयच्या शोधात फिरताना दिसतात. एवढेच नाही तर जय चे माहेरघर हे नागझीरा अभयारण्य असल्याने जय नागझीरा अभयारण्य तर आला नसावा.
याही अंदाजान्वये जयचा शोध घेणे सुरू आहे. एवढेच नव्हे तर नागझीरा व नवेगावबांध या व्याघ्रप्रकल्पात जय च्या शोधासाठी वनविभागाने चक्क हाय अलर्ट केले होते. जयच्या शोधासाठी अख्खे वनविभाग कामाला लागले आहे. एवढी शोधाशोध सुर ुअसुनही जय चा शोध लागला नाही. त्यामुळे वनविभागाची सुरक्षा कीती हा संशोधनाचा विषय ठरला आहे व याचे उत्तरही वनविभागालाच दयायचे आहे.
इकडे जय चा शोध सुरु असतांनाच साकोली तालुक्यात पोलिसांना माहिती मिळाली की वडेगाव येथील भिमलकसा तलावाच्या पाळीवर झोपडीत नऊ नक्षलवादी येऊन गेले.
माहिती मिळताच अख्खा जिल्ह्यातील पोलिसांनी वडेगाव परिसरातील जंगल पिंजून काढले. मात्र पोलिसांनाही नक्षलवाद्यांचा शोध लागला नाही. घटनेचा आठवडा उलटला मात्र पोलीस नक्षलवाद्याचा शोध घेतच आहेत. सध्या साकोली तालुक्यात वनविभाग जयच्या तर पोलीस नक्षलवाद्यांचा शोधासाठी फिरत आहेत.