वनविभागाने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:41 AM2021-08-20T04:41:16+5:302021-08-20T04:41:16+5:30
तालुक्यातील पोहरा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत मौजा मांगली व परिसरातील शेतकऱ्यांची गत आर्थिक वर्षात रानडुकरांनी धान शेतीचे पिके ...
तालुक्यातील पोहरा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत मौजा मांगली व परिसरातील शेतकऱ्यांची गत आर्थिक वर्षात रानडुकरांनी धान शेतीचे पिके उदध्वस्त केली. त्याअनुषंगाने नुकसान भरपाईसाठी वनविभागाला सरपंचांनी रीतसर अर्ज दिला होता. त्यानंतर संबंधित वनरक्षक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी सरपंचांसमक्ष मोक्का चौकशी केली. त्यामध्ये नुकसानीच्या ६० टक्के अपेक्षित रक्कम घालण्यात आली. परंतु आता संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन एकर नुकसानीचे दोन हजार व पाच एकर नुकसानीचे पाच हजार रुपये अत्यल्प रक्कम जमा झालेली आहे. ही एक प्रकारची शेतकऱ्यांची थट्टाच आहे. या नुकसान भरपाई रकमेमध्ये नेमकी रक्कम कमी कोणत्या आधारे करण्यात आली, ते लेखी स्वरूपात सांगावे व शेतकऱ्यांना जो अन्याय झाला त्या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अन्यथा वनविभागाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा सचिव तथा सरपंच प्रशांत मासुरकर यांनी दिला. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई रकमेतील घोळ दुरुस्त करण्याबाबत वनपरिक्षेत्रधिकारी अड्याळ यांना निवेदन देताना भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत मासुरकर, पोहरा जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख घनश्याम मते, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष निरंजन सार्वे, संजय रहपाडे उपस्थित होते.