‘तो’ वाघाचा व्हायरल व्हिडीओ लाखांदूर तालुक्यातील नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 03:08 PM2022-02-05T15:08:11+5:302022-02-05T15:24:02+5:30
लाखांदूर तालुक्यातील चिचोली, दहेगाव जंगल परिसरातील गावालगत वाघ असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भंडारा : गत महिनाभरापासून लाखांदूर तालुक्यात वाघाची दहशत झाली असून, सध्या तालुक्यात सोशल मीडियावर वाघाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ‘तो’ व्हिडीओ लाखांदूर तालुक्यातील असल्याची पुष्टी केली जात होती. मात्र, लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांनी स्पष्टीकरण देत, तो वाघाचा व्हायरल झालेला व्हिडीओ लाखांदूर तालुक्यातील नसल्याचे सांगत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले.
महिनाभरापूर्वी तालुक्यातील चौरास भागात वाघ आल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली होती. त्यानुसार वन विभागाने घटनास्थळाची चौकशी पंचनामा केला असता चौरास पट्ट्यातील ढोलसर शेतशिवारात वाघाचे पगमार्ग आढळून आले होते. त्यावेळी वन विभागामार्फत परिसरातील गावांत जनजागृती करीत नागरिकाना सतर्कतेचे आवाहन केले होते.
दरम्यान, गत २७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दहेगाव जंगल परिसरात वन्य प्राण्याने एका व्यक्तीवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. परिसरातील गावांत शेळी, कुत्रे यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याच्याही घटना उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांतच तालुक्यातील चिचोली, दहेगाव जंगल परिसरातील गावालगत वाघ असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, सायंकाळी जवळपास ६ वाजतापासूनच जंगल परिसरातील व गावांतील अंतर्गत रस्ते सुनसान दिसून येत आहेत.
दरम्यान, व्हायरल झालेला वाघाचा व्हिडीओ एका चारचाकीमधून काढला आहे. हा वाघ रस्त्यालगत असलेल्या नहराजवळ मोठ्याने डरकाळी देतानाही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. वाघाचा हा व्हायरल व्हिडीओ वन अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचताच वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्सम दिसणाऱ्या व नागरिकांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. जंगल परिसरात कॅमेरा लावल्याची माहितीही वन विभागाने दिली. मात्र, व्हिडीओतील रस्ता, त्यावरील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या व नजीकच्या भागाची प्रत्यक्ष व व्हिडीओतील भागाची पाहणी केली असता त्यात काही एक साम्य आढळून आली नाही. त्यामुळे वाघाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ लाखांदूर तालुक्यातील नसल्याचे स्पष्टीकरण वन विभागाने दिले असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे.