‘जय’च्या शोधात वनविभागाचा पराजय!

By admin | Published: September 30, 2016 12:37 AM2016-09-30T00:37:41+5:302016-09-30T00:37:41+5:30

उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यातून मागील चार महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’ च्या शोधासाठी भंडारा वनविभागाने संपूर्ण जंगल पालथा घातला

Forest department's defeat in search of 'Jai'! | ‘जय’च्या शोधात वनविभागाचा पराजय!

‘जय’च्या शोधात वनविभागाचा पराजय!

Next

स्पेशल ड्राईव्ह ठरले फार्स : शोधमोहिमेला पावसाचा ब्रेक
भंडारा : उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यातून मागील चार महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’ च्या शोधासाठी भंडारा वनविभागाने संपूर्ण जंगल पालथा घातला परंतु ‘जय’च्या कुठल्याही खाणाखुणा आढळून आलेल्या नाहीत.
वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी २६ सप्टेंबरपासून तीन ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबविण्याचे निर्देश दिले होते. भंडारा वनविभागातील १० ही वनपरिक्षेत्रातील संपूर्ण फौज या ड्राईव्हमध्ये सहभागी झाली होती. यात नाकाडोंगरी, जांब (कांद्री), लेंडेझरी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, अड्याळ आणि भंडारा वनपरिक्षेत्राचा समावेश होता.
या दहाही वनपरिक्षेत्रात १० ते १५ चमू तयार करण्यात आले होते. एका चमूत ५ ते ६ जणांचा समावेश करण्यात आला होता. या अभियानातील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘जय’ ची ओळख व्हावी, यासाठी ‘जय’चे छायाचित्र दिले होते. यात अधिकाऱ्यांपासून तर वनमजूर असा कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
या चमूकडे जीपीएस मॅपिंग प्रणाली देण्यात आलेली होती. त्यात दररोज किती अंतर फिरले, कोणत्या भागात फिरले, वन्यप्राणी दिसला असेल तिथला अक्षांश व रेखांश घेण्याच्या सूचना होत्या. याचवेळी कोणत्या प्राण्याची विष्ठा सापडली असल्यास आणि झाडावर ओरखडे आढळले असल्यास त्याची नोंद घेण्याचे निर्देश दिले होते. अड्याळ वनपरिक्षेत्रात १३ चमू तयार करण्यात आले होते. प्रत्येक चमूत चार जणांचा समावेश असून या चमू रात्रंदिवस जंगलात गस्त करण्यात आली.
वनविभागाने प्रथमच एखाद्या वाघासाठी अशाप्रकारचा ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबविण्यात आला होता. ‘जय’मुळे संपूर्ण वनविभाग अस्वस्थ झाला आहे. यात वन्यजीव विभागातील अनेक अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.
वन्यजीव क्षेत्रातील जाणकारांच्या मते, वनविभागाची ही धडपड केवळ औपचारिकता आहे. ‘जय’ सारखा वाघ चार महिने गप्प बसू शकत नाही. मागील चार महिन्यात एकाही पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याची घटना पुढे आलेली नाही. त्यामुळे त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचवेळी वनविभागातील काही अधिकारी दबक्या आवाजात ते मान्य करीत आहेत. परंतु प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुणीही स्पष्टपणे बोलण्याचे धाडस करीत नसल्याचे दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

सारवासारव
‘जय’ प्रकरणी वनविभागाला टीकेचा सामना करावा लागत आहे. १ आॅक्टोबरपासून वन्यजीव सप्ताह सुरू होत आहे. या सप्ताहावर ‘जय’चे सावट राहणार आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाची ही केवळ सारवासारव असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण विदर्भात पाऊस सुरू असून जंगल हिरवेगार झाले आहे. अशा स्थितीत वनअधिकारी आणि कर्मचारी घनदाट जंगलात पायी फिरून खरचं ‘जय’ चा शोध घेणार का, असा या निमित्ताने सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Forest department's defeat in search of 'Jai'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.