वन विरहित जीवन म्हणजे मानवाचे रुक्ष आयुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:35 AM2017-10-08T00:35:05+5:302017-10-08T00:35:17+5:30
समाजातील प्रत्येक व्यक्तीने जंगलतोड थांबविण्यासाठी मदत करावी. यामुळे वन्यजीवांना मनसोक्त जीवन जगण्याची मुभा दिल्यास वन्यजीवांचे रक्षण होईल व मनुष्याचे जीवन रुक्ष न होता उत्साही व आनंदी होईल,
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : समाजातील प्रत्येक व्यक्तीने जंगलतोड थांबविण्यासाठी मदत करावी. यामुळे वन्यजीवांना मनसोक्त जीवन जगण्याची मुभा दिल्यास वन्यजीवांचे रक्षण होईल व मनुष्याचे जीवन रुक्ष न होता उत्साही व आनंदी होईल, असे प्रतिपादन भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे यांनी केले.
संताजी कला व विज्ञान महाविद्यालय येथे निसर्ग मंडळ व कोका वन्यजीव संरक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वन्यजीव संरक्षण सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.गिरीश लांजेवार हे होते. तर प्रमुख पाहुणे वनपरिक्षेत्र अधिकारी निलय भोगे हे होते. प्रमुख वक्ते म्हणून चिचाळचे सरपंच मुनेश्वर काटेखाये, रत्नाकर नागलवाडे, सर्प मित्र न्याहारवानी, प्रा. डॉ. रवी पाठेकर, प्रा.डॉ.राजेंद्र खंडाईत, प्रा.रमेश बागडे, प्रा.नितीन थुल, प्रा.गोपाल तलमले, प्रा.अनिल कठाणे, प्रा.आशिष शेंडे, प्रा.गजभिये, जयदेव ढवळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकेतून प्रा.डॉ.रवी पाठेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून कार्यक्रमाच्या आयोजनाचा संपूर्ण वृत्तांत स्पष्ट केला. वन व वन्यजीवांचे संरक्षण करून त्यांच्याविषयी आस्था व जिव्हाळा ठेवल्यास मनुष्याचे जीवन सुरक्षित राहू शकेल. मनुष्याला दीर्घ आयुष्य जीवन जगायचे असेल तर वन व वन्यजीवाचे रक्षण करून त्याच्यावर भूतदया दाखवावी तेव्हाच मानवी जीवनाचा सातत्याने उद्धार होईल. वनाची व वन्यजीवाची कत्तल करण्यावर नियंत्रण ठेवून कडक कारवाई केल्यास मानवाचा विकास सातत्याने होईल असे प्रतिपादन मुनेश्वर काटेखाये यांनी व्यक्त केले.
सर्पमित्र रत्नाकर नागलवाडे यांनी वन्यजीव सप्ताहाच्या कार्यक्रमाप्रसंगी अनेक विषारी व बिनविषारी सापांच्या जाती व प्रजातीवर प्रकाश टाकला. तसेच सापाविषयी भीती व्यक्तीनी ठेवू नये व सापांना मारू नये. सर्वच सापाच्या जाती विषारी नसतात. म्हणून व्यक्तींनी आपल्या मनातील भीती नाहिशी केली तर अनेक जीवाचा जीव वाचतो असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रा.डॉ.गिरीश लांजेवार यांनी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. या उक्तीप्रमाणे वन्यजीवाचा मनुष्याच्या जीवनात व जीवन व्यवहारात फार महत्वपूर्ण स्थान आहे. त्यांच्या संरक्षणाशिवाय मनुष्य जीवन निरुत्साही ठरते. म्हणून सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी वन व वन्यजीवावर व्यक्तींनी प्रेम करायला पाहिजे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.नितीन थुल यांनी केले. तर आभार प्रा.रमेश बागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण देव्हारे, संदीप सेलोटे, डेव्हीड कुंभलकर, अंकीता ढोके, दर्शना मदनकर, प्रीती कोडे, सुषमा देशकर, स्नेहा लाडेकर, राजेंद्र पचारे, इंदिरा राऊत, हितेश ठवरे, जया कोडापे यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.