माजी नगरसेवकाला पोलिसांची बेदम मारहाण

By admin | Published: September 14, 2015 12:19 AM2015-09-14T00:19:05+5:302015-09-14T00:19:05+5:30

शिवाजी वॉर्डातील दुर्गा मंदिर समोर जुगार खेळणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई वरून झालेल्या वादात माजी नगरसेवक जुगलकिशोर भोंगाडे यांच्यासह ९ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Former corporator was beaten to death by the police | माजी नगरसेवकाला पोलिसांची बेदम मारहाण

माजी नगरसेवकाला पोलिसांची बेदम मारहाण

Next

प्रकरण जुगाराचे : पालिका उपाध्यक्ष भोंगाडे यांना धक्काबुक्की, तक्रारीवरुन एपीआय वर्माविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल
भंडारा : शिवाजी वॉर्डातील दुर्गा मंदिर समोर जुगार खेळणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई वरून झालेल्या वादात माजी नगरसेवक जुगलकिशोर भोंगाडे यांच्यासह ९ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात पोलिसांवर हल्ला करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास शुक्रवारी वॉर्डात घडली.
या मारहाणीत जुगलकिशोर भोंगाडे हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. मारहाणीत खांद्याचे हाड फॅक्चर झाल्याचे त्यांच्यावार उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान कविता भोंगाडे यांच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसांनी सहायक पोलीस निरिक्षक सुधीर वर्मा यांच्याविरुद्ध भादंवि ३५४ व मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा व अन्य पोलीस कर्मचारी शिवाजी वॉर्डात दुर्गा मंदिरासमोरच्या झाडाखाली जुगार खेळत असल्याच्या माहितीवरून घटनास्थळी गेले. कारवाई करीत असताना योगेश भोंगाडे यांनी पोलिसांना शिवीगाळ करून आमदार चरण वाघमारे यांचे नाव नामोल्लेख करून कारवाई करण्याची धमकी दिली. त्यानंतर माजी नगरसेवक जुगलकिशोर भोंगाडे, एकनाथ भोंगाडे, शिवशंकर भोंगाडे, रवी भोंगाडे, गोलू लांजेवार व अन्य तीन ते चार लोकांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. पोलिसांच्या ताब्यातील जुगार खेळणारे चारही आरोपींना पळवून लावले व स्वत:सुद्धा पळून गेले. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक जुगलकिशोर भोंगाडे व योगेश भोंगाडे यांच्या घरी गेले असता घरातील महिलांनी पोलिसांना फसविण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा भादंवि १४३, १४७, १४९, १८६, २२५, २९४, ३३२, ५०६, ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण करीत आहेत.
आमदार चरण वाघमारे यांनी पोलिसांची कायदेशीर बाजू लक्षात न घेता जुगाराचे आरोपी पळवून नेणारे योगेश भोंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांची बाजू घेऊन त्यांना अटक न करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला. मारहाण करण्यात आलेल्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडून बसले, असा आरोप करुन पोलिसांनी आ. वाघमारे यांची निंदा करीत असल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांच्या कारवाईचा निषेध - चरण वाघमारे
पोलिसांच्या असंविधानिक कृतीमुळे शासन जर बदनाम होत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून ते खपवून घेणार नाही. चुकीच्या कामाचा नेहमीच विरोध करेन. चुकीच्या व्यक्तीचे समर्थन करणार नाही. कायदा पोलिसांच्या हातात आहे. परंतु कुणालाही नाहक वेठीस धरत असेल तर त्यासाठी समोर राहीन, असे सांगून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी आमदार चरण वाघमारे यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत केली. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती नरेश डहारे, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष हिरालाल बांगडकर, माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर, प्रशांत लांजेवार उपस्थित होते. यावेळी आ.चरण वाघमारे म्हणाले, शुक्रवारी परिसरातील शिवाजी वॉर्डात मागील तीन दिवसांपासून विचित्र घटना घडत आहेत. याप्रकरणी पोलिसांची कारवाई संशयास्पद असून नगर पालिका उपाध्यक्ष कविता भोंगाडे यांना घरात शिरून धक्काबुक्की करणे त्यांचे पती जुगलकिशोर भोंगाडे यांना बेदम मारहाण करणे हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे. कुठल्याही प्रकारचा दोष नसतानाही जुगल भोंगाडे यांच्या घरात शिरून पोलिसांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली. घरी उपस्थित महिलांनाही धक्काबुक्की करून सर्वांवर हौदातील पाणी फेकण्यात आले. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. पोलीस ठाण्यात सामान्य नागरिकांना सौजन्याची वागणूक द्या, असे गृहविभाग सांगत असताना येथे धाकदपदशाही सुरू आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आ.वाघमारे यांनी केली.

Web Title: Former corporator was beaten to death by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.