आगीत चार जनावरे होरपळली
By admin | Published: May 28, 2016 12:36 AM2016-05-28T00:36:16+5:302016-05-28T00:36:16+5:30
पवनी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेया शिमनाळा येथे शेतकरी नाना देशमुख व रामदास देशमुख यांच्या मालकीच्या तणसीच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली.
तणसीचे ढिगारे जळाले : आर्थिक मदतीची मागणी
पालोरा : पवनी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेया शिमनाळा येथे शेतकरी नाना देशमुख व रामदास देशमुख यांच्या मालकीच्या तणसीच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. यात चार ट्रॅक्टर तणीस, एक बंडी, आंब्याचे झाड व चार जनावरे जळाले. बंडी पुर्णता जळून राख झाली असून शेतकऱ्यांचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
येथील शेतकरी जनावरांच्या वैरणाकरिता गावालगत असलेल्या खाली जागेवर तनसीचे ढिगारे ठेवीत असतात. तिथेच मोठे आंब्याचे वृक्ष असल्यामुळे सावलीचा आसरा घेत जनावरे बांधतात. आताच शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची चुरणी करुन तनसीचे ढिगारे ठेवले आहेत. बुधवारी दुपारी १ वाजता एकाएकी आग लागल्यामुळे ग्रामस्थांच्या लक्षात येताच घटनास्थळी धाव घेतली. प्रत्येकाने वाटेल त्या पध्दतीने पाण्याची सोय केली. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. वेळीच येथील रेतीघाट मालकांनी परिस्थिती लक्षात घेता वेळीच ट्रॅक्टरवरील पाण्याची टाकी पाठविली होती. त्यामुळे आग आटोक्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा संपूर्ण तणसीचे ढिगारे जळून खाक झाले असते असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
यात नाना देशमुख शिमनाळा यांच्या सात गाई आगीच्या कचाट्यात सापडून गंभीर जखमी झाल्या. यात चार गाईची प्रकृती अति गंभीर आहे. रामदास देशमुख यांच्या मालकीची बैलगाडी व तणीस जळाली आहे. वेळीच येथील पशुवैद्यकीय अधिकारी ए.एस. वरकटे यांनी जनावरांवर उपचार सुरु केले. येथील तलाठी गडले यांनी घटनास्थळी चौकशी करुन एक लाख रुपयाची नुकसान पंचनाम्यात दाखविली आहे. आता जनावरांची वैरण कुठून आणवे कर्ज कसे फेडावे अशा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
विहीरगाव येथे घराला आग
उसर्रा : मोहाडी तालुक्यातील ग्राम विहीरगाव येथील घराला आग लागून लाखो रुपयांचा नुकसान झाले. शुक्रवारी सकाळी विहीरगाव निवासी किशोर धर्माजी गोमासे यांचे घराला अचानक आग लागली आग लागल्याचे लक्षात येऊन गावकऱ्यांनी तुमसर नगरपरिषदेची अग्निशामक दल बोलविण्यात आले. तोपर्यंत घरातील लाखो रुपयांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणी पीडित कुटुंबाने केले आहे. दरम्यान तलाठी विहीरगाव यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे. (वार्ताहर)