वरठीत एकाच रात्री चार घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:08 PM2018-04-27T23:08:37+5:302018-04-27T23:08:37+5:30
कुलूपबंद घरांना लक्ष्य करीत चोरांनी एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी केली. सदर घटना गुरूवारी रात्री वरठीतील नेहरू वॉर्डात घडली. एकाच गल्लीतील चार घरांना लक्ष्य करून अज्ञात चोरटांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : कुलूपबंद घरांना लक्ष्य करीत चोरांनी एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी केली. सदर घटना गुरूवारी रात्री वरठीतील नेहरू वॉर्डात घडली. एकाच गल्लीतील चार घरांना लक्ष्य करून अज्ञात चोरटांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तीन घरात प्रवेश करण्यात चोरांना यश मिळाले तर चौथ्या ठिकाणी अपयश लाभले. चारही घराचे घरमालक बाहेरगावी असल्यामुळे या घटनेत किती नुकसान झाले याची माहिती मिळाली नाही.
सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. मुलांना सुटी असल्यामुळे बाहेर गावी जातात. याचा नेमका फायदा घेत चोरांनी कुलूप बंद घरांना लक्ष्य केले. नेहरू वाडार्तील एकाच गल्लीतील चार घरांना फोडण्यात आले. तीन घराचे समोरच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. घरातील आलमारी फोडून सामानाची नासधूस केली. आलमारीतील नेमके कोणते साहित्य चोरीला गेले याची माहिती मिळू शकली नाही. यात सुमन ढवळे , पंकज प्रजापती, व ताराचंद कलंबे यांच्या घरी चोरांनी चोरी केली. दिलीप बावनकुळे यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आले. पण दरवाज्याला असलेले सेन्टर लॉक तोडता न आल्याने त्यांना घरात शिरता आले नाही. सुमन ढवळे व त्यांचे भाडेकरू यांचे घरातील आलमारीचे कुलूप तोडण्यात आले होते. आलमारीतील साहित्य बाहेर फेकण्यात आले होते. आलमारीचे लॉकर उघडलेले होते. सामाजिक कार्यकर्ते चेतन डांगरे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी पंचनामा केला. यात चोरटे हे सराईत नसावे असा अंदाज व्यक्त केला आहे. घराचे कुलूप सराईत गुन्हेगाराप्रमाणे शिताफीने उघडलेले नव्हते. कुलूप तोडताना लोखंडी साधनांचा वापर करून तोडल्याचे निदर्शनास आले. घरमालकच उपस्थित नसल्याने पोलिसांना तपासात अडचण निर्माण होत आहे.
खबरदारी घेण्याचे आवाहन
बाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबीयांनी घराची योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांनी केले आहे. सध्या लग्न समारंभाचा हंगाम सुरु असल्यामुळे बाहेर गावी जाणाºयांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडतात. कुटुंबीयांनी घराच्या सुरक्षेची खबरदारी घेऊन पोलीस ठाण्यात नोंद करावी, अशी सुचनाही त्यांनी केली.