म्युच्युअल फंडात गुंतविले चार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 09:49 PM2018-12-05T21:49:57+5:302018-12-05T21:50:16+5:30

भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता नियमबाह्यपणे चार कोटी एक लक्ष रुपयांची रक्कम म्युच्युअल फंडात गुंतविली, असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत केला.

Four crore invested in mutual funds | म्युच्युअल फंडात गुंतविले चार कोटी

म्युच्युअल फंडात गुंतविले चार कोटी

Next
ठळक मुद्देनियमबाह्य प्रकार : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता नियमबाह्यपणे चार कोटी एक लक्ष रुपयांची रक्कम म्युच्युअल फंडात गुंतविली, असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत केला.
येथील विश्रामगृहात बुधवारी दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर दमाहे, जिल्हा उपाध्यक्ष केशव बुरडे आदी उपस्थित होते. माहिती देतांना ते म्हणाले की, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संजीव बावणकर यांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता गुंतवता न येणारी संस्थेची ४ कोटी १ लक्ष रुपये म्युच्युअल फंडात नियमबाह्यपणे गुंतविली. ही गुंतवणूक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आली. एकंदरीत या संदर्भात बहुमताने या विषयावर संचालकांनी नामंजूरी दिली होती. तरी संस्थेच्या अध्यक्षानी स्वत:चे आर्थिक हितसंबंध साधण्यासाठी गुंतवणूक केली आहे.
संस्थेच्या कर्जमर्यादा व ठेवीवरील व्याज दराबाबत बोलताना ज्ञानेश्वर दमाहे व रमेश सिंगनजुडे म्हणाले की, १ डिसेंबर २०१८ पासून कर्जमर्यादा १२ लक्ष रुपये करुन कर्जावरील व्याजदर १ टक्के कमी केले आहे. परंतु संस्थेच्या अध्यक्षांनी जाणीवपुर्वक दुसरी बाजू सभासदांसमोर येवूच दिली नाही. ती म्हणजे, सभासदांच्या सर्वच प्रकारच्या ठेवीवर १ टक्के व्याज दर कमी करण्यात आला आहे. सभासदांच्या निस्वार्थ हितासाठी संस्था २ टक्क्यांच्या फरकावर चालत होती. परंतु सध्या संस्था ३ टक्क्यांच्या फरकावर व्यवहार करीत असल्यामुळे सभासदांवर अन्याय होत आहे. संस्थेची विद्यमान सभासद संख्या २६०० असून कर्मचारी ३१ आहे. आकृतीबंधानुसार ३५ कर्मचाºयांचा आकृतीबंध मंजूर होता. मात्र त्यावेळी संस्था संगणीकृत नव्हती. संस्थेने ४० लक्ष रुपयांपेक्षा जास्त खर्च करुन संस्था संगणीकृत केली आहे. त्यावरही २७ नोव्हेंबर २०१८ ला संचालक मंडळाच्या सभेत कर्मचारी भरती करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. कर्मचारी संख्या कमी होण्यापेक्षा विद्यमान अध्यक्षांनी कर्मचारी भरती करण्याचा घाट रचला आहे.
आधीच कार्यरत कर्मचाºयांना वेतनापोटी दरमहा १० लक्ष २५ हजार रुपयांचा खर्च करीत आहे. त्यामुळे कर्मचारी भरती करण्याच्या प्रश्नच उद्भवत नाही. पवनी येथे शाखा कार्यालयाकरिता झालेल्या खरेदीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या संचालकांनी मागीतलेल्या सर्व साधारण सभेचे कार्यवृत्त मागीतल्यावरही देण्यात येत नाही. पत्रकार परिषदेला अशोक ठाकरे, विजय चाचेरे, कैलाश चव्हाण, जे. एम. पटोले आदी उपस्थित होते.


म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेल्या तीन कोटी ५० लाख रूपयांवर व्याजापोटी एक लाख ८५ हजार ४६२ रूपयांचे व्याज ४ डिसेंबर २०१८ ला संस्थेला प्राप्त झाले आहे. गुंतवणूक केलेली रक्कम राज्य सहकारी अधिनियम कायद्यांतर्गत करण्यात आली होती. कर्मचारी भरती आकृतीबंधानुसारच करण्यात येणार असून कर्मचाºयांची संख्या ३५ इतकीच राहणार आहे. पवनी येथील शाखा इमारतीचा खरेदीचा व्यवहार पूर्णत: पारदर्शक असून कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. संस्था आणि सभासदांच्या हितासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून धादांत खोटे आहेत.
-संजीव बावनकर,
अध्यक्ष जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था, भंडारा.

Web Title: Four crore invested in mutual funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.