रानडुकराच्या हल्ल्यात चार जण जखमी; भंडारा तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2022 02:54 PM2022-08-06T14:54:24+5:302022-08-06T14:57:46+5:30
रानडुकराने गावात प्रवेश केल्याचे माहित होताच भीतीचे वातावरण पसरले.
भंडारा : जंगलातून गावात शिरलेल्या एका रानडुकराने तीन महिलांसह चौघांना जखमी केल्याची घटना भंडारा तालुक्यातील आमगाव येथे शनिवारी सकाळी १० वाजता घडली. जखमींना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मीराबाई देवराम सारवे (५५), शोभा गुलाब थोटे (५७), देवकाबाई वासुदेव सारवे (५७) आणि सोपान मनोहर शेंडे( २७) अशी जखमींची नावे आहेत. देवकाबाई सारवे शनिवारी सकाळी शेतात गवत आणायला गेल्या होत्या. त्यावेळी अचानक रानडुकराने हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर काही वेळात रानडुकराने गावात प्रवेश केला. त्यात मीराबाई, शोभा आणि सोपान यांच्यावर हल्ला करून जखमी केले.
रानडुकराने गावात प्रवेश केल्याचे माहित होताच भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक जी. आर. नागदेवे, बीटरक्षक व्ही.के. नेवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जखमींना तात्काळ भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.