गणनेत भंडारा जिल्ह्यात आढळले चार सारस पक्षी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 11:38 AM2023-06-20T11:38:15+5:302023-06-20T11:41:19+5:30

जिल्ह्यात पक्ष्यांचा अधिवास, पुन्हा एकदा झाले शिक्कामोर्तब

Four Sarus Crane were found in Bhandara district during the enumeration | गणनेत भंडारा जिल्ह्यात आढळले चार सारस पक्षी!

गणनेत भंडारा जिल्ह्यात आढळले चार सारस पक्षी!

googlenewsNext

भंडारा : सारस पक्ष्यांनी अधिवास सोडला नसून ते भंडारा जिल्ह्यातच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रविवारी १८ जूनला केलेल्या सारस पक्षी गणना मोहिमेत तुमसर तालुक्यात चार सारस पक्ष्यांचा अधिवास असल्याची अधिकृत नोंद झाली आहे. यातील दोन सारस प्रौढ असून दोन समवयस्क आहेत.

सेव्ह इकोसिस्टीम अँड टायगर (सीट) भंडारा आणि सेवा संस्था, गोंदिया या दोन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वन विभागाने रविवारी १८ जूनला सारस गणना केली. वन विभागाच्या माध्यमातून दरवर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सारस पक्षी गणना घेतली जाते. यंदाच्या मोहिमेदरम्यान भंडारा, मोहाडी व तुमसर तालुक्यातील वैनगंगा व त्याच्या उपनद्यांच्या क्षेत्रातील सारसचे अस्तित्व असलेल्या १९ संभाव्य ठिकाणी गणना करण्यात आली. यात तुमसर तालुक्यातील गोंडीटोला येथील तलाव व लगतच्या शेतशिवारात सकाळी ६ वाजता चार सारस आढळले.

सारसच्या गणना मोहिमेंतर्गत २०१७ रोजी तीन सारस आढळले होते. २०१८ मधील मोहिमेत दोन तर २०१९ मध्ये पुन्हा तीन सारस पक्ष्यांची नोंद झाली होती. २०२० आणि २०२१ला दोन तर २०२२ ला तीन सारसची नोंद घेण्यात आली होती. यावर्षी ही संख्या चार झाली आहे.

जिल्हा सारस संवर्धन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या नेतृत्वात व समिती सचिव उपवन संरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली ही गणना घेण्यात आली. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील ९ सारस मित्र, ३१ स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. परिविक्षाधीन भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी अनय नावंदर, भंडारा जिल्हा मानद वन्यजीव रक्षक नदीम खान, शाहिद खान, सहायक वनसंरक्षक साकेत शेंडे, वरिष्ठ पक्षी अभ्यासक व माजी मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब, सेवा संस्था गोंदियाचे सावन बाहेकर, तुमसरचे वन परिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले, भंडाराचे संजय मेंढे, नाकाडोंगरीचे मनोज मोहिते यांच्यासह वन कर्मचारी सहभागी झाले होते.

अधिवास कायमच

उच्च न्यायालयाला सादर केलेल्या सारस संवर्धन व व्यवस्थापन आराखड्यानुसार, स्थानिकांचा सहभाग संवधर्न मोहिमेत वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबिवले जात आहेत. ६ मे रोजी ‘चला जाणू या नदीला’ या उपक्रमादरम्यान जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सुकळी परिसरात हे चार सारस पाहिले होते. त्यानंतर विचारण करीत असताना ते तुमसर तालुक्यातील वाहनी येथे आढळून आले होते. त्यामुळे सारस पक्ष्यांनी अधिवास सोडला नसून ते जिल्ह्यातच असल्याचे भंडारा उपवन संरक्षकांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Four Sarus Crane were found in Bhandara district during the enumeration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.