चार संशयितांना चौकशीनंतर सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 01:03 AM2016-06-16T01:03:48+5:302016-06-16T01:03:48+5:30
अज्ञात समाजकंटकांनी हनुमान मूर्तीची विटंबना केली. याप्रकरणी चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते.
देव्हाडी येथील प्रकरण : संभाषणाची रेकॉर्डिंग पोलिसांनी दिली
तुमसर : अज्ञात समाजकंटकांनी हनुमान मूर्तीची विटंबना केली. याप्रकरणी चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. मंगळवारी या चौघांनाही पोलिसांनी सोडले. दरम्यान मंदिर समिती सदस्याने एका ज्येष्ठ नागरिकानेच मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणाची संभाषणाची रेकॉर्डींग तुमसर पोलिसांना दिली. यानंतर एक वेगळेच वळण या प्रकरणाला लागले आहे.
सोमवारी सायंकाळी देव्हाडी येथील हनुमान मंदिरातील मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्याच रात्री चार संशयीत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान एक संशयीत आरोपी पसार झाला. मंगळवारी दिवसभर तुमसर पोलिसांनी संशयीत आरोपीची कसून चौकशी केली. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास मंदिर समितीचे सदस्य मनोज चौबे यांनी मंदिराजवळील घरमालकाला मूर्ती विटंबनाप्रकरणी कुणी आढळले का? अशी विचारणा केली. तेव्हा आपणच मूर्तीची विटंबना केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान चार संशयीतांना तुमसर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सोडले. या वरिष्ठ नागरिकाच्या आवारातच जुने हनुमान मंदिर आहे. सन १९७८ मध्ये १४,२८३ चौरस फुटचा भूखंड व पडके घर संबंधितांनी घेतले होते. त्यानंतर त्यांनी आभारभिंत तयार केली होती. परंतु हनुमान मंदिरात ये जा करिता त्यांनी जागा सोडली होती. हनुमान मंदिर परिसरात मद्यप्राशन तथा गांजा ओढणारे यांचा वावर असल्याने आपण त्रासून गेलो आहे अशी माहिती घरमालकाने पोलिसांना दिली. वरिष्ठ नागरिक असल्याने या प्रकरणात अटक करता येत नाही. परंतु संपूर्ण चौकशी व ठोस पुराव्यानंतर नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)