'त्या' नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी चार पथके जंगलात तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 03:24 PM2022-09-22T15:24:17+5:302022-09-22T15:25:37+5:30

इंदोरा जंगल : शीघ्र कृती दलाकडून शोधमोहीम, वन कर्मचाऱ्यांचा खडा पहारा

Four teams camped in the forest to arrest the man-eating CT-1 tiger | 'त्या' नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी चार पथके जंगलात तळ ठोकून

'त्या' नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी चार पथके जंगलात तळ ठोकून

Next

भंडारा : तीन जिल्ह्यात बारा जणांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ या हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यासाठी चार पथके बुधवारी सकाळपासून लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगलात तळ ठोकून आहेत. बुधवारी सकाळी तलावाजवळ एका इसमाला ठार मारल्यानंतर वनविभाग या वाघाला जेरबंद करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. वन कर्मचारी मचानवरून खडा पहारा देत असून, शार्प शूटर वाघाला बेशुद्ध करण्याच्या तयारीत आहेत.

लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगलात तलावावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका इसमाला वाघाने हल्ला करून ठार मारले. ही घटना बुधवारी उघडकीस येताच वनविभागात एकच खळबळ उडाली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्रह्मपुरी, वडसा आणि इंदोरा या जंगलात संचार असलेल्या या वाघाने आतापर्यंत १२ जणांना बळी घेतला. त्यात लाखांदूर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. या वाघाला तत्काळ जेरबंद करण्यासाठी भंडारा, वडसा आणि गोंदिया येथील शीघ्र कृती दलासह नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पथक जंगलात तळ ठोकून आहेत.

भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात साकोली सहायक उपवनसंरक्षक रोशन राठोड, शिघ्र कृती दलाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे, लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित, मानव वन्यजीव संरक्षक शाहिद खान या जंगलात तळ ठोकून आहेत. जंगलात सर्वत्र वाघाचा शोध घेण्यात आला; परंतु सायंकाळपर्यंत थांगपत्ता लागला नाही. रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. गुरुवारी पुन्हा शोधमोहीम सुरू झाली आहे. वाघाला बेशुद्ध करण्यासाठी शार्प शूटर सज्ज असून, जंगलात वगार बांधून ठेवण्यात आली आहे.

तलावावर मासे पकडणे जीवावर बेतले; वाघाने जंगलात फरफटत नेऊन केले ठार

दरम्यान, इंदोरा जंगल परिसरातील तलावात मासेमारीकरता गेलेल्या विनय मंडल याला वाघाने हल्ला करून ठार मारले. याबाबत माहिती मिळताच अरुणनगरवरून त्याच्या कुटुंबीयासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचलेल्या पत्नीने आपल्या पतीचा मृतदेह पाहताच टाहो फोडला. तिचा आक्रोश आसमंत भेदणारा होता. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. सायंकाळी विनयच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

मात्र दिवसभराच्या शोध मोहिमेनंतर हल्लेखोर वाघाचा थांगपत्ता लागला नाही, या वाघाच्या पावलाच्या ठस्यावरून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. या घटनेने लाखांदूर तालुक्यात एकच खळबड़ उडाली आहे.

मचानवरून वन कर्मचाऱ्यांचा पहारा

सीटी-१ या वाघाचा शोध घेण्यासाठी इंदोरा-अरुणनगर परिसरातील जंगलात मचान उभारण्यात आले आहे. या मचानवर वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, वाघाचा शोध घेण्यासाठी हे कर्मचारी मदत करणार आहेत.

ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे

इंदोरा जंगलात एका इसमाला ठार मारणाऱ्या वाघाचा शोध घेण्यासाठी जंगल परिसरात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. या वाघाला कोणत्याही परिस्थितीत बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी वनविभाग सज्ज झाला आहे.

लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगलात वाघाला जेरबंद करण्यासाठी पथक दाखल झाले आहे. आपण स्वतः या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहो. वाघाचा संचार असल्याने नागरिकांनी या भागात जाणे टाळावे, सकाळी व सायंकाळी जंगल परिसरात जाऊ नये. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना परिसरातील गावांत देण्यात आल्या आहेत.

राहुल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा

Web Title: Four teams camped in the forest to arrest the man-eating CT-1 tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.