चार वाघ, पाच बिबट, १७ अस्वलांसह ६६६ वन्यजीवांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 05:00 AM2022-05-21T05:00:00+5:302022-05-21T05:00:24+5:30
कोका अभयारण्यात विविध पाणवठे, नैसर्गिक तलावांवर १७ मचानी बांधण्यात आल्या. प्रगणनेसाठी ३४ प्रगणकांची ऑनलाईन अर्जाद्वारे निवड करण्यात आली. त्यापैकी २५ प्रगणकांनी हजेरी लावली होती. तसेच अभयारण्याचे १७ कर्मचारी यात सहभागी झाले होते. सोमवारी सायंकाळी ४ वाजता सुरू झालेली प्रगणना दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी चार वाघ, पाच बिबट, १७ अस्वल, ५१ गवे, ३२४ रानडुकर, ११४ चितळ, १३ नीलगाय, १३ रानकुत्रे, २२ सांबर, १८ मोर, २ सायळ, ४९ वानर आढळून आले.
युवराज गोमासे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोका वन्यजीव अभयारण्य वन्यजीवांच्या पसंतीचे आश्रयस्थान ठरल्याचे निसर्गानुभव प्रगणनेत दिसून आले आहे. या समृद्ध जंगलात चार वाघ, पाच बिबट, १७ अस्वलांसह ६६६ वन्यजीवांचे दर्शन झाले. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव श्रेत्राअंतर्गत बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्र प्रकाशात निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत वन्यप्राण्यांची मचानावरून प्रगणना करण्यात आली.
कोका अभयारण्यात विविध पाणवठे, नैसर्गिक तलावांवर १७ मचानी बांधण्यात आल्या. प्रगणनेसाठी ३४ प्रगणकांची ऑनलाईन अर्जाद्वारे निवड करण्यात आली. त्यापैकी २५ प्रगणकांनी हजेरी लावली होती. तसेच अभयारण्याचे १७ कर्मचारी यात सहभागी झाले होते. सोमवारी सायंकाळी ४ वाजता सुरू झालेली प्रगणना दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी चार वाघ, पाच बिबट, १७ अस्वल, ५१ गवे, ३२४ रानडुकर, ११४ चितळ, १३ नीलगाय, १३ रानकुत्रे, २२ सांबर, १८ मोर, २ सायळ, ४९ वानर आढळून आले. वन्यजीव विभागाच्यावतीने ही प्रगणना घेण्यात आली. यात वन्यजीव प्रेमींसह वनाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. वन्य प्राण्यांचे दर्शन झाल्याने सर्वांमध्ये पौर्णिमेच्या रात्री उत्साह संचारला होता.
वाघिणीसह बछड्यांचे झाले दर्शन
- अभयारण्यातील एका तलावावर २९ एप्रिल रोजी वाघिणीसह तीन बछड्यांचे दर्शन जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना झाले होते. त्यानंतर तीन आठवडे पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. प्रगणना दरम्यान त्या वाघिणीसह बछड्यांच्या दर्शनाची उस्त्सुकता होती. अखेर सायंकाळी व सकाळच्या सुमारास त्याच तलावावर वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचे दर्शन प्रगणकांना झाल्याने त्यांचा आनंद अवर्णनीय होता.
निसर्गानुभवाने प्रगणक आनंदले
- निसर्गाच्या सानिध्यात व वन्यजीवांच्या सहवासात झालेला निसर्गानुभव कार्यक्रम प्रगणकांसाठी पर्वणी ठरली. रात्रीच्या सुमारास स्मशान शांतता, वन्यजीवांचा आवाज, थंड हवेची झुळूक, अचानक पालापाचोळ्यांचा आवाज, रमणीय पहाट, उंच डोंगर व दऱ्या, पाणवठ्यांवर प्राण्यांची सावध उपस्थिती आदी अनुभव नावीन्यपूर्ण तसेच भावविभोर करणाऱ्या ठरल्याची प्रतिक्रिया कार्यक्रम संपल्यानंतर अनेक प्रगणकांनी दिली.