चार वर्षात शेतकरी हिताचा एकही निर्णय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:50 PM2018-04-10T23:50:05+5:302018-04-10T23:50:05+5:30
चार वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केलेल्या सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : चार वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता स्थापन केलेल्या सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.
शहिदांना अभिवादन आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काढण्यात आलेली शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा मंगळवारला भंडाऱ्यात पोहोचली. त्यावेळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
यावेळी पाटिल म्हणाले, शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्यातील विविध ४० शेतकरी संघटनांनी सुकानु समिती स्थापन केली. त्यानंतर १९ मार्चपासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून राज्यव्यापी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ही शेतकरी जागृती यात्रा कोकण, मुंबई, कर्नाटक, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भासह आतापर्यंत १६ जिल्ह्यात पोहोचली असून राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकºयांना शहीद संबोधून शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा अधिक मोबदला देण्याची गरज आहे. असे असताना कृषी मूल्य आयोग लागवड खर्चाच्या आधारावर समर्थन मूल्य देत नाही. स्वामीनाथन आयोगाने आपल्या अहवालात ही शिफारस केली आहे. त्यामुळे शेतकºयांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटनेने आता जनतेच्याच न्यायालयात आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाटील म्हणाले, निर्यातबंदी आणि संघटित गुन्हेगारी या समस्यांमुळे राज्यातील गरीब शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी हितासाठी आवाज उचलणारे सभागृहात मौन धारण करून राहतात. काँग्रेसने जे केले तेच भाजपही करीत असल्याचा आरोप पाटिल यांनी केला. पत्रपरिषदेत शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपटे, विदर्भप्रमुख दिनकर दाभाडे, बळीराजा किसान संघटनेचे गणेशकाका जगताप, सत्यशोधक किसान सभेचे किशोर ढमाले, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, ऊस कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आनंद भालेकर व पदाधिकारी उपस्थित होते.