चौरास भागात ‘धरण उशाला, कोरड घशाला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 09:41 PM2019-02-06T21:41:03+5:302019-02-06T21:41:49+5:30
अथांग पाणी असलेले गोसे धरण डोळ्याने दिसते. परंतु पाणी मात्र मिळत नाही. सिंचनासाठी विहिरींचाच आधार घ्यावा लागतो. परंतु उन्हाळ्यात विहिरींनीही तळ गाठला. अशा परिस्थितीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पवनी, लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासाठी धरण उशाला, कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे.
खेमराज डोये।
लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव (चौ.) : अथांग पाणी असलेले गोसे धरण डोळ्याने दिसते. परंतु पाणी मात्र मिळत नाही. सिंचनासाठी विहिरींचाच आधार घ्यावा लागतो. परंतु उन्हाळ्यात विहिरींनीही तळ गाठला. अशा परिस्थितीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पवनी, लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासाठी धरण उशाला, कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे.
पवनी-लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी कसदार. विहिरीच्या पाण्यावर सिंचन करून दुभार-तिभार शेती केली जाते. परंतु गोसे प्रकल्पाच्या कालव्याच्या बांधकामाने आणि शेतीसाठी अतिपाण्याच्या उपसामुळे आता जलपातळी खोल गेली आहे. परिसातील ८० टक्के विहिरी कोरड्या पडत आहेत. उन्हाळ्यातही हिरवेगार दिसणारे शेत आता पडीक दिसू लागले आहे. वैनगंगा नदी चौरस भागाच्या जवळून वाहते. गोसेखुर्द हा महत्वाकांक्षी प्रकल्प पवनी तालुक्यात आहे. धरणाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम करताना भूमीगत जलप्रवाह रोखण्यात आले. परिणामी विहिरींंचे झरे आटले. तेथू चौरास भागांच्या शेतीला घरघर लागली. बारमाही वाहणारे नदीही कोरडी पडू लागली. रेतीच्या उपशाने त्यात भर पडली. या सर्वांचा परिणाम अप्रत्यक्षपणे सिंचनावर होत आहे.
चौरास भागात मोठ्या प्रमाणात जलसाठा होता. त्यामुळे येथील शेतकरी वर्षातून खरीप, रबी अशी भाताची दोन पिके घेत होते. इतर पिकांचीही भर पडत होती. मात्र परिस्थिती बदलत गेली. आता डावा कालवा बांधून आहे. परंतु त्यातून पाणी येत नाही.
हजारो हेक्टर शेती पाण्यासाठी तहानली आहे. पाणी नसल्याने मोटारपंपही बंद आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना यातना सहन कराव्या लागते.
डावा कालवा ठरला अभिशाप
गोसे प्रकल्पाचा डावा कालवा चौरास भागातून जातो. १२ किलोमीटरच्या कालव्याचे काम २० वर्षापासून पूर्ण झाले नाही. या ना त्या कारणाने काम रखडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीच मिळेनासे झाले. गेल्या पाच वर्षापासून कालव्यावरील लघुवितरिकाही तयार झाल्या नाही. गेट लावले नाही. या सर्वाचा परिणाम सिंचनावर होत आहे. गोसे धरणाचा कालवा चौरास भागासाठी अभिशाप ठरत आहे.