१.५२ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:35 AM2021-03-17T04:35:53+5:302021-03-17T04:35:53+5:30
गोंदिया : अन्न व औषध प्रशासनाकडून शहरात तंबाखू बाळगणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर येथील स्थानिक गुन्हे शाखेनेही सुगंधित तंबाखू बाळगणाऱ्या ...
गोंदिया : अन्न व औषध प्रशासनाकडून शहरात तंबाखू बाळगणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर येथील स्थानिक गुन्हे शाखेनेही सुगंधित तंबाखू बाळगणाऱ्या एकावर कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. १३) सायंकाळी ५.४० वाजतादरम्यान शहरातील श्रीनगर परिसरातील पंचशील चौकात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पथकाने १.५२ लाख रुपये किमतीचा २३५ किलो तंबाखू जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगवर असताना त्यांना श्रीनगर पंचशील चौक परिसरात लखन रमेशलाल नागदेव (वय २८) याने मुकेश तिघारे यांचे घर भाड्यावर घेऊन तेथे मोठ्या प्रमाणात सुंगधित तंबाखू साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. यावर पथकाने पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी देशपांडे यांना माहिती देऊन बोलावून घेतले. तसेच नागदेव याने तंबाखू साठवून ठेवलेल्या घरावर त्यांनी छापा टाकला.
यामध्ये एक लाख ५२ हजार रुपये किमतीचा २३५ किलो सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विविध कंपन्यांच्या सुगंधित तंबाखूचा समावेश
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेल्या २३५ किलो सुगंधित तंबाखूत विविध कंपन्यांच्या तंबाखूचा समावेश आहे. यामध्ये, ३९ हजार ६०० रुपये किमतीची रिमझिम तंबाखूची प्रत्येकी एक किलो वजनाची ७२ पाकिटे, ४० हजार रुपये किमतीची आर.के. तंबाखूची प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाची ४०० पाकिटे, ६१ हजार ६०० रुपये किमतीची भाग्यश्री तंबाखूची प्रत्येकी ५० ग्रॅम वजनाची १४०० पाकिटे, सहा हजार २४० रुपये किमतीची राजश्री पानमसालाची प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाची ५२ पाकिटे, एक हजार ६०० रुपये किमतीची एम.डी. तंबाखूची प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाची १६ पाकिटे तसेच तीन हजार रुपये किमतीची जाफरानी, के.पी. ब्लॅक लेबल-२, व्ही-१, पानबाग, पानराज, जनम, पी-४ अशा विविध ब्रँडच्या तंबाखूंच्या पाकिटांचा समावेश आहे.