आधारभूत धान खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:32+5:302021-06-11T04:24:32+5:30
यंदाच्या उन्हाळी हंगामात जवळपास ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिकाची लागवड करण्यात आली. सदर लागवडीनुसार गत पंधरवड्यापूर्वीपासून ...
यंदाच्या उन्हाळी हंगामात जवळपास ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिकाची लागवड करण्यात आली. सदर लागवडीनुसार गत पंधरवड्यापूर्वीपासून लागवडीखालील धान पिकाची कापणी व मळणी मोठ्या वेगाने सुरू आहे. शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार तालुक्यात मंजूर १६ आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत जवळपास ८ हजार १५२ शेतकऱ्यांनी सातबाराची नोंदणीदेखील केली आहे. मात्र तब्बल पंधरवडा लोटूनही तालुक्यात गोदाम सुविधांअभावी खरेदी सुरू न करण्यात आल्याने हजारो शेतकऱ्यांचे मळणी पूर्ण धान घरात व उघड्यावर साठवणूक केली आहे.
तथापि, सध्यास्थितीत गोदाम सुविधा उपलब्ध असलेल्या तालुक्यातील काही केंद्रांतर्गत जवळपास २८ हजार १५२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र गतवर्षीच्या उन्हाळी हंगामात तालुक्यात जवळपास साडेतीन लाख क्विंटल धानाचे उत्पादन घेण्यात आल्याची माहिती आहे. सदर धानाची तालुक्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत खरेदी करण्यात आली होती. या तुलनेत यंदा देखील उन्हाळी हंगामात तेवढ्याच धानाचे उत्पादन होण्याची शक्यता असून आतापर्यंत केवळ २८ हजार १५२ क्विंटल धानाची खरेदी झाली असताना उर्वरित धानाची खरेदी केव्हा केली जाणार? असा प्रश्न धान उत्पादक शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, शासकीय योजनेनुसार तालुक्यात धान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्याने अनेक शेतकरी धान साठवणुकीसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने खासगी व्यापाऱ्यांना प्रति क्विंटल ५०० ते ६०० रुपये कमी दराने विक्री करीत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याचीदेखील भीती व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन येत्या ३० जूनपर्यंत तालुक्यातील तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी होण्यासाठी द्रुतगतीने धान खरेदी होण्यासाठी आवश्यक उपाययोजना व कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली जात आहे.
बॉक्स :
केंद्रचालकांकडून अवैध वसुली
उन्हाळी हंगामातील धान खरेदीसाठी तालुक्यातील १६ आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार सदर खरेदी केंद्राअंतर्गत धान खरेदी सुरू करण्यात आली. मात्र तालुक्यातील काही धान खरेदी केंद्र चालकांद्वारा शेतकऱ्यांकडून अवैधरित्या गोदाम भाड्यासह प्रती क्विंटल ५० रुपयांची वसुली केल्या जात असल्याचा आरोप उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यात केला जात आहे.