ऑनलाइन लाखो रुपयांची फसवणूक; सायबर चोरटे नेहमी सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:29 PM2024-09-02T12:29:52+5:302024-09-02T12:32:35+5:30

ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांत वाढ : पोलिसांची होतेय दमछाक

Fraud of lakhs of rupees online; Cyber thieves are always active | ऑनलाइन लाखो रुपयांची फसवणूक; सायबर चोरटे नेहमी सक्रिय

Fraud of lakhs of rupees online; Cyber thieves are always active

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
भंडारा :
जिल्ह्यात अलीकडे ऑनलाइन पेमेंट व व्यवहार वाढीस लागले आहेत. यामुळे बँकांमध्ये जाऊन गर्दीत ताटकळण्याचा त्रास कमी झालेला आहे. परंतु, ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. सायबर चोरटे नेहमी सक्रिय राहून सामान्य लोकांच्या खात्यातून ऑनलाइन पैसे पळवितात. फसवणूक झालेल्या लाखो रुपयांतून हजारांतही रक्कम परत मिळत नाही, असे चित्र दिसून येत आहेत.


अनेकांच्या मोबाइलवर एक फोन येतो, कोणत्याही कारणानुसार ओटीपी मागितला जातो किंवा लिंकवर क्लिक करायला सांगितले जाते. तसेच, नवनव्या प्रकाराने ऑनलाइन गंडा घातला जातो. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात अनेक नागरिकांना अशा प्रकारचा ऑनलाइन गंडा घालण्यात आलेला आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी वेळीच पोलिसात तक्रार होणे गरजेचे आहे. परंतु बऱ्याचदा असे होताना दिसून येत नाही. 


ही व्यक्ती असतात टार्गेट 
सायबर गुन्हेगार शक्यतो वृद्ध नागरिक, महिला, तरुणी किंवा लहान मुले यांना आपले टार्गेट करतात. कारण, या व्यक्ती सायबर गुन्हेगारांच्या सहज जाळ्यात अडकतात. त्यामुळे फसवणूकच होऊ नये, यासाठी काय करायचे, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे.


फसवणूक टाळण्यासाठी काय करावे? 
पैशांशी संबंधित किया बँक खाते, ई-वॉलेट यासंबंधी कुणी वृद्ध, महिला, तरुणी किंवा लहान मुले यांना माहिती विचारत असेल, तर त्यांनी आपल्या घरातील कर्त्या व्यक्तीच्या कानावर हा प्रकार तातडीने घालावा. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तत्काळ पोलिसांना कळवावे. सायबर चोरट्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी बँकेशी संबंधित कुठलाही तपशील देऊ नये, इतरांना ओटीपी, पिन सांगू नये, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता असते.


अशी घ्यावी खबरदारी 
फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार घडू नयेत, यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला, मोबाइलवरून आलेल्या फोनला किंवा ई-मेलला प्रतिसाद देण्याची काहीही गरज नाही. अगदीच वाटले तरच त्यांना प्रतिसाद द्यावा. घरातील दोघा-तिघांना हा प्रकार सांगा. संबंधित व्यक्ती खोटी तर नाही ना, याची पडताळणी करून घ्या. त्याहीपेक्षा कोणीही तुम्हाला फोन करून तुमचे बैंक खाते, विमा पॉलिसी, ई-वॉलेट किंवा अन्य इंटरनेट व्यवहारांबाबत विचारणा करत असेल ना, तर त्यांना कोणतीही माहिती देऊ नये. 


पोलिस नियंत्रण कक्षाला कळवावे
बँकेच्या तपशिलाबाबत विचारणा केली जात असेल तर ती व्यक्ती खरी आहे की खोटी आहे, यासंबंधी अधिक जाणून घ्यावे. त्यामुळे फसवणूक होण्यापासून वाचू शकाल. व्यक्ती खोटी बोलत असल्याचे समजल्यानंतर पोलिस ठाणे अथवा सायबर पोलिसात माहिती द्यावी. वेळीच पोलिसांना माहिती दिल्यास आरोपींना शोधणे सोपे जाते. परंतु, यापूर्वी पोलिस नियंत्रण कक्षाला तक्रार करूनही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. सायबर चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसही बऱ्याच प्रमाणात अपयशी ठरताना दिसत आहेत. 
 

Web Title: Fraud of lakhs of rupees online; Cyber thieves are always active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.