शेतकऱ्यांना थेट शेतावर जाऊन मोफत ई पीक पाहणी नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:15+5:302021-09-11T04:36:15+5:30
बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती ऑनलाइन पद्धतीने गोळा करायची आहे. याकरिता स्वत:चा किंवा शेजारचा ...
बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती ऑनलाइन पद्धतीने गोळा करायची आहे. याकरिता स्वत:चा किंवा शेजारचा स्मार्टफोन अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागात केवळ तीस टक्के लोकांच्या घरी स्मार्टफोन आहेत. तेव्हा प्रत्येकाला स्मार्ट फोन घेऊन ऑनलाईन ई पीक पाहणी नोंदणी शक्य नसल्याने शेतकरी वर्गात एकच खळबळ माजली; मात्र गावच्या तरुणाने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत दररोज ३० ते ३५ शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नोंदणीची धडाडी सुरू ठेवली आहे. यात शेतकऱ्याकडून कोणतीही शुल्काची अपेक्षा न ठेवता मोफत सेवा सुरू केली आहे; मात्र काही गावात प्रतिशेतकऱ्याकडून १००ते २०० रुपयांपर्यंतची वसुली सुरू आहे. शेतकरी अशिक्षित अडाणी व अठराविश्वे दारिद्र्यात असल्याने त्याला दुसऱ्याच्या मदतीशिवाय ऑनलाईन पीक पाहणी, नोंदणी शक्यच नसल्याने शंभर, दोनशे रुपयांचा भुर्दंड त्याला सहन करावा लागत आहे; मात्र याला मऱ्हेगावचा तरुण हरीश अपवाद ठरला असून दररोज तीन-चार दिवसांपासून नियमित सेवा देत आहे. गावात त्याचे कौतुक होत आहे.
चौकट
शासनाच्या वतीने १५ सप्टेंबर ई पीक पाहणी नोंदणीची अंतिम तारीख दिली होती; मात्र आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी वर्गाला नोंदणीसाठी पुरेसा वेळ मिळण्याचे निश्चित झाले आहे.
प्रतिक्रिया
गावातील शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यामुळे त्याच्यावर नोंदणीचा खर्च बसू नये. याकरिता स्वतः पुढाकार घेत शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारावर ऑनलाइन पद्धतीने ई पीक पाहणी नोंदणीचे कार्य हाती घेतले आहे. शेतकरी हिरिरीने सहभाग घेत असल्याने माझा उत्साह कायम आहे. एका शेतात केवळ पाच ते दहा मिनिटेच लागतात. इतरत्र वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या सेवेत वेळ दिल्यास काय वाईट. या विचाराने माझ्या गावच्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नोंदणी सुरू आहे.
हरीश शेंडे, सदस्य, ग्रामपंचायत, मऱ्हेगाव