शिधापत्रिका नसलेल्यांनाही आता होणार मोफत धान्य पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:24+5:30
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून असे तीन महिने मोफत धान्य दिले जात आहे. एपीएल, केशरी शिधापत्रिकाधारकांना या सवलतीच्या लाभ मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. अशा व्यक्तींच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांना धान्य वितरण करण्यात येणार आहे.
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून असे तीन महिने मोफत धान्य दिले जात आहे. एपीएल, केशरी शिधापत्रिकाधारकांना या सवलतीच्या लाभ मिळाला आहे. मात्र, या योजनेचा लाभ विनाशिधापत्रिकाधारकांना देण्यात आला नव्हता. त्यामुळे शिधापत्रिका नसलेले बेघर, स्थलांतरीत कामगार व अडकून पडलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांना हे धान्य मिळण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. अशांंना मोफत तांदूळ देण्यास आता मंजुरी मिळाली आहे. या लाभार्थ्यांना त्यांचा आधारकार्ड नंबर किंवा शासनाकडून देण्यात आलेले कोणतेही ओळखपत्र पाहून धान्य दिले जाणार असून, त्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयाने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
सर्वसामान्यांना मिळणार लाभ
लाभार्थ्यांच्या याद्या तयार झाल्यानंतर त्या रास्त धान्य दुकानदाराकडे दिल्या जाणार आहेत. त्यानंतर धान्याचे वाटप होणार आहे. राज्यातील लाखो गरीब व गरजू नागरिकांना मोफत धान्याचा लाभ मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे..